डॉक्टरांवरील वाढते हल्ले चिंताजनक बाब : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 09:39 PM2018-07-07T21:39:44+5:302018-07-07T21:40:48+5:30
देशातील डॉक्टरांवरील होणारे हल्ल्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक : शरद पवार
पाषाण : राज्यात व देशात डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब आहे यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून यात राज्यकर्ते व पोलीस यांच्यासह समाजातील सर्वांची जबाबदारी महत्वाची आहे, असे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
बाणेर बालेवाडी मेडीकोज असोसिएशनच्या वतीने बाणेर येथे डॉक्टर दिनानिमित्त आयोजित वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या डॉ.नीरज आडकर,डॉ.शिरीष हिरेमठ,असोसिएशनसाठी महत्वपूर्ण कार्य करणारे डॉ.राजेश देशपांडे यांच्यासह गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जे.एस.महाजन, संस्थापक डॉ.राजेश देशपांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, पालिकेचे डॉ. राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, पूर्वी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांवर हल्ले होत नसत. परंतु, अलीकडे याचे प्रमाण वाढत आहे. देशातील डॉक्टरांवरील होणारे हल्ल्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. याबाबत आपण सर्वांनी विचार करण्याची गरज असून याविरोधात कठोर कायदे करण्याची गरज आहे. अमेरिका किंवा इतर देशात उपचार करुन घेण्याचे आकर्षण आपल्याकडे जास्त असते. तरीही आपल्याकडेच त्यांच्यापेक्षा चांगली रुग्णसेवा मिळते व त्या त्या क्षेत्रात काम करणा-या डॉक्टरांना असे रुग्ण हाताळण्याचा अनुभवही त्यांच्यापेक्षा जास्त असून हे मी स्वत: अनुभवले आहे. विविध गंभीर आजाराचे रुग्ण योग्य रीतीने हाताळण्याचे कौशल्य व अनुभव असलेले डॉक्टर आपल्या देशात किंबहुना आपल्या राज्यात असून याचा आपल्याला अभिमान आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हीच मंडळी आपल्याला विश्वास व दिलासा देऊन जीवनमान सुधारण्याचे कार्य करत असतात, असेही ते म्हणाले. यावेळी औंध,बाणेर ,बालेवाडी परिसरातील बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.