लहान मुलांमध्ये वाढतोय ‘ताप’, संसर्गजन्य आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:07 AM2018-08-14T02:07:08+5:302018-08-14T02:07:34+5:30
पावसाळी वातावरणामुळे लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्दी, ताप, खोकल्याने लहान मुले त्रस्त झाली आहेत.
पुणे - पावसाळी वातावरणामुळे लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्दी, ताप, खोकल्याने लहान मुले त्रस्त झाली आहेत. त्यातच डेंग्यूचे प्रमाणही वाढू लागल्याने पालकांमधे भीतीचे वातावरण असून थोडा ताप आला तरी रुग्णालयांकडे धाव घेतली जात आहे.
पावसाळा सुरू झाला की संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. मागील काही आठवड्यांपासून शहरात पावसाळी वातावरण आहे. या दिवसांमध्ये डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डेंग्यु, मलेरियासारखे आजार तसेच संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्या लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांकडे गर्दी होत आहे. सतत ताप येणे, अंगावर पुरळ, लाल चट्टे, छातीत कफ भरणे, नाक चोंदणे ही लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहेत. दीड ते दोन वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये संसर्गजन्य ताप व सर्दी-खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांचा ताप कमी होत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
काही मुलांच्या हातापायांवर पुरळ येत असून लाल चट्टेही दिसत आहेत. अंगदुखीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ही डेंग्यूची लक्षणे असल्याने पालक घाबरून रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. डेंग्यूचे प्रमाण मोठ्या मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे. तसेच पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबाचे प्रमाण वाढत चालले आहे.
काय काळजी घ्यावी
लहान मुलांना घेऊन बाहेर फिरू नये
पाणी उकळून प्यावे
डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा
ताप, सर्दी, खोकल्या असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये
लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये
पाणी, सरबत अधिक प्रमाणात द्यावे
ताप कमी होत नसल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे
सर्दी, खोकल्यासह ताप आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. दीड वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये छातीत कफ असल्याचे प्रमाण अधिक आहे. हात-पाय-तोंडावर चट्टेही दिसतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांकडे सध्या अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांना आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
- डॉ. रश्मी गपचुप, बालरोगतज्ज्ञ
पावसाळी वातावरणामुळे लहान मुलांना ताप येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संसर्गजन्य तापामुळे पालकांनी लहान मुलांबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. ताप उतरत नसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- डॉ. केयूर महाजन, बालरोगतज्ज्ञ