वाढते कोरोना रुग्ण आणि लॉकडाऊनच्या शक्यतेचा उद्योग विश्वाला फटका. पुण्यातील कंपन्यांचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटले.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:38 PM2021-04-01T15:38:11+5:302021-04-01T15:44:17+5:30
मराठा चेंबर चे सर्वेक्षण अनिश्चिततेमुळे फटका बसला असण्याची शक्यता. केंद्र सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देण्याची मागणी.
रुग्ण वाढ आणि लॉकडाऊन ची शक्यता यामधून निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका उद्योग विश्वाला काही प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यातील उद्योग विश्व काही प्रमाणात सावरायला सुरुवात झाली होती. पण लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आणि रुग्ण संख्या वाढायला लागली तसा मार्चमध्ये उत्पादनामध्ये मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी घट झाली आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 48 टक्के कंपन्यांनी त्यांचा उत्पादन हे पूर्वपदावर आल्याचं म्हटलं आहे. तर उर्वरित कंपन्यांनी पूर्वपदावर येण्यासाठी ३ ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल असं सांगितलं आहे. दरम्यान रोजगाराचे प्रमाण मात्र फेब्रुवारी इतकेच म्हणजे 86% राहिले आहे आहे. लॉकडाऊन लागल्यास यात आणखी फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे लॉकडाऊन नकोच अशी भूमिका एमसीसीआयए च्या वतीने घेण्यात आली आहे.
गेल्यावर्षीचा लॉकडाऊन आणि कोरोना याचा फटका उद्योग विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला होता. त्याच पार्श्वभूमीवर मराठा चेंबर च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. हे बारावे सर्वेक्षण असून यामध्ये कोरोनाचा कंपन्यांवर झालेला परिणाम याचा अभ्यास करण्यात येत आहे. आत्ता करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पुणे जिल्ह्यातील शंभर कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
या सर्वेक्षणानुसार कंपन्यांचे उत्पादन हे फेब्रुवारी पेक्षा दोन टक्क्यांनी घटले आहे. तसेच जानेवारी 2020 च्या उत्पादन पातळीवर यायला त्यांना साधारण पुढचे तीन ते सहा महिने लागू शकतात. 48 टक्के कंपन्यांचे उत्पादन हे पूर्व पातळीवर आले आहे तर 19 टक्के कंपन्यांच्या मते साधारण तीन महिन्यांमध्ये ते पूर्वपदावर येईल. तर 17 टक्के कंपन्याना मात्र यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकेल असे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.
याच पार्श्वभूमीवर एमसीसीआयए चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी लॉकडाऊन नको अशी भूमिका घेतली आहे. "लॉकडाउन लागल्यास उद्योग विश्व पुन्हा कोलमडेल. त्यामुळे लॉकडाऊन ला आमचा विरोध आहे. लसीकरण वाढवल्यास जास्तीत जास्त लोक उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतील" असे मेहता म्हणाले.
दरम्यान संचालक प्रशांत गिरबने यांच्या मते " एप्रिल पासून फेब्रुवारी पर्यंत सर्व सर्वेक्षणातून उद्योग विश्व पुन्हा उभे रहात असल्याचे चिन्ह दिसत होते. पण मार्चमध्ये याला थोडा फटका बसलेला दिसत आहे. फर्म जेवढी लहान तेवढा रिकव्हरी ला लागणारा वेळ जास्त आहे. त्यामुळेच सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देणे गरजेचे आहे"