शहरात डेंग्यूचा वाढतोय प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:29 AM2018-06-17T00:29:32+5:302018-06-17T00:29:32+5:30
पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांमध्येदेखील वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ६९ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ३३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे : पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांमध्येदेखील वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ६९ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ३३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सात वर्षांत २०१७ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली. त्यावर्षी तब्बल ६ हजार ३९० रुग्ण डेंग्यूने बाधित झाले होते.
साधारण जून ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्यूचा प्रादूर्भाव तुलनेने अधिक असल्याचा दिसून येत आहे. या वर्षी जानेवारी ते १५ जून या कालावधीत २५२ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पैकी ६९ जूनच्या पंधरवड्यातील असून, ३५ रुग्ण तर या आठवड्यातच आढळले आहेत. शहरातील २५ रुग्णांना २०१२ ते २०१६ या कालावधीत आपले प्राण गमवाले लागले आहे.
>डेंग्यू रूग्णांची आकडेवारी
गेल्यावर्षी (२०१७) जून ते नोव्हेंबर या कालावधीत ६ हजार ३९० पैकी ६ हजार २७६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्यात जून महिन्यात ५८, जुलै २२८, आॅगस्ट ७८६, सप्टेंबरमध्ये १ हजार ११४ आणि नोव्हेंबरमध्ये १ हजार ७९६ रुग्णांचा समावेश आहे. या वर्षी (२०१८) जानेवारीमध्ये ७९ रुग्ण आढळले आहेत.
दूषित पाण्यामुळे होणाऱ्या डायरियाच्या संख्येत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. शहरात शहरात २०११ साली ८ हजार २१६, २०१२ साली ९ हजार ३८०, २०१३ मध्ये ७ हजार ८०४ रुग्णांची नोंद झाली.
त्यात गेल्या तीन वर्षांपासून चांगली घट झाली असून, २०१५ मध्ये १ हजार ८४२, २०१६ मध्ये ७४३ आणि गेल्या वर्षी ५७५ रुग्णांची नोंद झाली. तर, १५ जूनअखेरीस डायरियाचे २१२ रुग्ण आढळून आले आहेत.