खंडपीठाच्या मागणीला वाढता जोर
By admin | Published: June 30, 2015 12:35 AM2015-06-30T00:35:00+5:302015-06-30T00:35:00+5:30
पुणे शहरामध्ये नागरिकांच्या सोईसाठी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी दक्षिण पुणे वकील संघटनेने सोमवारी काम बंद आंदोलन केले.
धनकवडी : पुणे शहरामध्ये नागरिकांच्या सोईसाठी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी दक्षिण पुणे वकील संघटनेने सोमवारी काम बंद आंदोलन केले. सर्व कायदेविषयक कामे बंद ठेवून आंदोलन करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मागणी मंजूर होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
या मागणीसाठी सर्वच वकील संघटनांच्या बरोबरच विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळे, संस्था तसेच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा यासाठी पाठिंंबा मिळत आहे. सोमवारी धनकवडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात दक्षिण पुणे वकील संघटनेच्या वतीने आंदोलन करत दिवसभरासाठी काम बंद ठेवले. ३४ वर्षांपासून पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी वारंवार मागणी तसेच आंदोलने करण्यात आली. तरीदेखील सरकारच्या वतीने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला असल्याचे अॅड. प्रवीण नलवडे यांनी सांगितले. उच्च न्यायालयामध्ये एकूण खटल्यामध्ये ४५ टक्के खटले पुणे शहर व जिल्ह्यातील असण्याबरोबरच या ठिकाणी खंडपीठ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोई सुविधा असतानादेखील या ठिकाणी खंडपीठ होत नसल्याने शहरापासून ते तालुकास्तरावरील सर्वच विविध वकील संघटनांनी अनेक दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू ठेवून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. (वार्ताहर)