झोपडपट्ट्यांचे वाढते अतिक्रमण, घाणीच्या साम्राज्यात मूलभूत गरजाही अपूर्ण, यंत्रणेला अपयश, पुनर्वसनानंतरही ताबे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:28 AM2017-11-29T03:28:36+5:302017-11-29T03:28:51+5:30
पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत.
- गौरव कदम
सहकारनगर : पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत. घाणीच्या साम्राज्यात ते राहत असताना वाढतच जाणाºया अतिक्रमणाला थांबविणे शासकीय यंत्रणेला शक्य होत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. जनता वसाहतीची सध्या ६० ते ७० हजार लोकसंख्या असल्याचे सांगण्यात येते.
पुण्याच्या पर्वती परिसरात १९७५ साली आसपासच्या गावांमधील गरजू नागरिकांनी रोजगारासाठी प्रवेश केला. रस्त्यावर झोपता झोपता ऋतूचक्रापासून बचाव म्हणून झोपड्या बांधण्यास सुरुवात झाली. पर्वती पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेले ठिकाण होते. त्याच वारशाच्या आजुबाजूला जनता वसाहत नावाने मोठी झोपडपट्टी वसण्यास सुरुवात झाली. गरज आणि गरिबी आंधळी असते, असे म्हणतात.
येथील नागरिकांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे, यासाठी वाल्मीकी आवास योजना, घरकुल योजना अशा पद्धतीच्या शासकीय योजना राबविल्या जाव्यात, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांची त्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये सुविधा खर्च नाही. पक्क्या घरात, इमारतींमध्ये गेल्यास खर्च वाढेल, अशी अनेक नागरिकांची मानसिकता आहे. काही नागरिकांकडे पैसे असूनही जागेवरील हक्क जाईल, या भीतीने ते जागा सोडत नाहीत. अनेक नागरिकांनी चढ्या भावाने घरे विकली अथवा भाड्याने दिली आहेत.
अनेक कुटुंबांना वा विद्यार्थ्यांना कमी भाड्यात जागा मिळत असल्याने येथे आश्रय घेतला जातो. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे वातावरण दूषित होऊन युवावर्ग भुरट्या चोºयांकडे वळत आहे.
नागरिकांनी पुढील पिढी संस्कृत, शिक्षित असावी, यासाठी योग्य पर्याय निवडून विरोधाला विरोध न करता शासकीय योजनेशी समतोल राखत पुढाकार घेऊन योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे.
स्वच्छतागृहांमध्ये घाण
स्वच्छतेबाबत जनजागृती नसल्याने वसाहतीमध्ये अनेक जागी खुल्यावर शौच केले जाते. जागोजागी गुटखा खाऊन थुंकलेल्यांमुळे पिचका-या पाहण्यास मिळतात. शासकीय स्वच्छतागृहांमध्ये कही खुशी कही गम अशी अस्वछतेची भयानक परिस्थिती पाहण्यास मिळते.
जनता वसाहतीमधील कचरा घाण पावसामुळे शेजारील कालव्यात जात आहे. हे सर्वच नागरिकांना पुढे धोकादायक व आजारी पडण्यास कारणीभूत ठरते. कालव्याच्या बाजुस सुरक्षा जाळी बसविली असली तरी कपडे-भांडी धुण्याचे काम कालव्यातच केले जाते. सांडपाणी वाहिनीचे योग्य नियोजन वसाहतमध्ये होणे गरजेचे आहे.
जनता वसाहतीमध्ये नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती होणे, होणाºया आजारांचे मुख्य कारण समजणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये शासकीय पातळीवर औषध फवारणी, संसर्गजन्य रोगांची माहिती पुरविणे गरजेचे आहे.
थंडीच्या दिवसांत अनेक जागी गाडीचे टायर सर्रास जाळले जातात. पर्वतीवरून सकाळी जनता वसाहतमधून मोठ्या प्रमाणात निघणाºया धुराचे दर्शन होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण
पाहावयास मिळते.