‘तेजस्विनी’कडे वाढतोय महिलांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 08:35 PM2018-04-13T20:35:04+5:302018-04-13T20:35:04+5:30
‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली.
पुणे : खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी’ या बससेवेकडे दिवसेंदिवस महिलांचा ओढा वाढत चालला आहे. मागील महिनाभरात दोन लाखांहून अधिक महिलांना या बसने प्रवास केला असून त्याद्वारे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आणखी काही मार्गांवर ही सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून विचार केला जात आहे.
‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन मिडी बसच्या माध्यमातून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू केली. एकुण ८ मार्गांवर ३० बसेसमार्फत ही सेवा दिली जात आहे. यापुर्वी केवळ दोनच मार्गांवर ही सेवा सुरू होती. या बसेसच्याही मोजक्याच फेऱ्या होत होत्या. महिलांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बस संख्या वाढविण्यात आली नव्हती. मात्र, तेजस्विनी सेवा सुरू झाल्यानंतर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सध्या तेस्विनीच्या ८ मार्गांवर २१८ फेºया होत आहेत. बहुतेक सर्वच मार्गांवर महिलांचा ओढा या सेवेकडे वाढू लागला आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ मार्च ते ७ एप्रिल या महिनाभरात सुमारे २ लाख ३ हजार महिला प्रवाशांना विशेष बससेवेतून प्रवास केला आहे. त्यानुसार दैनंदिन सरासरी ६ हजार ७६६ महिला या बसने प्रवास करत आहेत. या माध्यमातून पीएमपीला दररोज सरासरी ८६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दिवसागणिक यामध्ये वाढ होत असून महिलांकडून पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मार्ग वाढविण्याबरोबरच बसेसच्या संख्येत वाढ करण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते.
------------
दि. ८ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत मिळालेले उत्पन्न व प्रवासी संख्या
सरासरी दैनंदिन उत्पन्न - तिकीट विक्री - ८३ हजार ५२६
पास - २ हजार ३८४
एकुण उत्पन्न - ८५ हजार ९१०
सरासरी दैनंदिन प्रवासी - दैनंदिन तिकीटधारक - ६ हजार ७२८
पास - ३८
एकुण प्रवासी - ६ हजार ७६६
------------------------------
मागील महिनाभरात महिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अन्य मार्गांवर बससेवा सुरू करण्याची मागणी आहे. त्यानुसार या सेवेचा मार्गनिहाय अभ्यास करून बस वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी
पीएमपी