रस्त्यात गाठून लुबाडण्याचे वाढते प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:38+5:302021-06-17T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नागरिकांना रस्त्यात गाठून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दारूसाठी पैसे मागून लुबाडण्याचे प्रकार वाढत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नागरिकांना रस्त्यात गाठून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दारूसाठी पैसे मागून लुबाडण्याचे प्रकार वाढत आहेत. बिबवेवाडी आणि हिंगणे खुर्द येथे जबरी चोरीचे प्रकार समोर आले आहेत.
हिंगणे खुर्द येथील महादेवनगर परिसरात पार्टीसाठी पैसे पाहिजेत म्हणून तरुणाच्या गळ्याला कोयता लावून खिशातील पैसे काढून घेतले.
याप्रकरणी सागर ढेबे (रा. साईनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा छगन मरगळे (वय १९, रा. साईनगर) यांनी सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कृष्णा आपल्या मित्रांबरोबर महादेवनगर येथील एका स्वीट मार्टसमोर १३ जून रोजी दुपारी थांबला होता. त्यावेळी सागर तेथे आला व त्याने मला पार्टीला पानशेतला जायचे आहे. तुझ्याकडील सर्व पैसे दे नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकी देऊन कोयता गळ्याला लावला. कृष्णा याने नकार देताच त्याने मी वडगावचा भाई आहे, असे म्हणत कोयता हातात फिरवून कृष्णा यांच्या खिशातील २ हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
बिबवेवाडीतील यश लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकाला दुचाकीस्वाराला चोरट्यांनी अडवून दमदाटी करत त्यांच्याजवळील मोबाईल व जेवणाचा डबा हिसकावून घेतला. अविनिश निवृत्ती मोरडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.