विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध वाढतेय
By admin | Published: July 6, 2017 02:50 AM2017-07-06T02:50:59+5:302017-07-06T02:50:59+5:30
शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकत आहे. त्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे शाळा प्रशासनाचे व पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मात्र, यामध्ये इतर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे आहे.
शहरात विद्यालय परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे. एकतर्फी प्रेम, प्रेमाला विरोध यांमुळे छेडछाड आणि मारहाणीच्या घटना घडतात. वर्गात भांडण झाल्यावर शाळा सुटल्यावर विद्यार्थी टोळीने एखाद्या मुलाला मारहाण केली जाते. परत त्यांचा राग, खुन्नस म्हणून बाहेर भांडणे होतात. असे प्रकार अनेक वर्षांपासून येथे घडत आहेत. या शाळेतील मुलांना राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचे पाठबळ मिळत असल्याने भांडणांना अजूनच जोर येत असल्याचे चित्र दिसत आहे.
महात्मा गांधी शाळेसमोरील रस्त्यावर ५ दिवसांपूर्वी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत भांडणे झाली होती. दरम्यान, शाळा सुटली असल्याने विद्यार्थी सैरावरा पळत सुटले होते. या घटनेमुळे शाळा परिसरात विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शिक्षकांकडून त्याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती करणे आवश्यकता असल्याचे पालकांचे मत आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात तक्रार पेटी ठेवणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या निर्भीडपणे शिक्षकांशी मांडता येईल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पोलीस आणि शिक्षक यांच्यामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शिक्षकांनाही स्थानिक पोलिसांना वेळोवळी चर्चा करून आवश्यक माहिती द्यावी. तसेच, बाहेर टवाळखोर मुलांना ताब्यात घेऊन त्याना समज देण्यात यावी. मात्र, शहरातील गेल्या काही घटना या विद्यालयाच्या बाहेर झाल्या असल्यामुळे विद्यालय प्रशासन जबबादारी झटकते. त्यामुळे या संदर्भात पोलिसांकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अ
शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची भांडणे होत नाहीत. शाळेच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यामुळे भांडणे करणारे विद्यार्थी लगेच पकडले जातात. अनेक भांडणे करणाऱ्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याला शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस एका पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करून अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पोलीस कर्मचारी कमी असल्याने कर्मचारी उपलब्ध होत नाही.
- सुनील जाधव, (प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर)
शाळेत विद्यार्थ्यांमध्ये टोळीने भांडणे होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना समज देऊन चौकशी करून विदयार्थ्यांच्या टोळ्या मोडून काढण्यात येईल. उद्याापासून येथे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी पोलीस कर्मचारी पाठविण्यात येईल.
- राम पठारे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग)