कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे फुफ्फुसाच्या विकारांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:59 AM2017-10-28T00:59:16+5:302017-10-28T00:59:33+5:30
पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईनंतर पुण्याच्या काही भागांत कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे कबुतरखाने तयार होत आहेत.
पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईनंतर पुण्याच्या काही भागांत कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे कबुतरखाने तयार होत आहेत. परंतु याचा परिणाम थेट नागरिकांवर होत असून, कबुतरामुळे पुणेकरांमध्ये फुफ्फुस व श्वासाचे विकार वाढत असल्याचे मत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. याबाबत नागरिकांममध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत पल्मॉनॉलॉजिस्ट डॉ. अजित कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.
सह्याद्र्रि हॉस्पिटल येथे फुफ्फुस विकार व थोरॅसिक सर्जरी विभाग (छातीचा पिंजरा) सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन कॅनडा येथील युनिव्हर्सिटी आॅफ ब्रिटिश कोलंबिया हॉस्पिटलच्या लॅबोरेटरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अँड्रयु चुर्ग, युनिट हेड डॉ. केतन आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. दीपा दिवेकर, पल्मॉनॉलॉजिस्ट डॉ. अजित कुलकर्णी, जनरल थोरॅसिक व थोरॅकोस्कोपी सर्जन डॉ. संजय कोलते आणि सह्याद्रि हॉस्पिटलचे इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅफ इंटरस्टिशिअल लंग डिसीजेस या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन समिती अध्यक्ष डॉ. महेंद्र कावेडिया, वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन अभ्यंकर यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी पुण्यात कबुतरांचे प्रमाण वाढत असून, यांचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टारांनी सांगितले.
याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले, की कबुतरांची विष्ठा आणि पिसं यांच्यासोबत वाळलेल्या विष्ठेतून अस्परजिलस प्रकारची बुरशी निर्माण होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अॅलर्जी आणि धाप लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कबुतरांची विष्ठा बंद घरांमध्ये, घराच्या खिडकीमध्ये साफसफाई न झाल्याने तशीच राहिली तर त्यातून श्वसनमार्गाला धोकादायक असे वायू तयार होऊन त्यातूनही फुफ्फुसांचे संसर्ग वाढतात. कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या सीरममधील न्यूमोनायट्रेसचा संसर्ग होऊन सतत थकवा येणे, झोप येणे, निरुत्साह वाटत असल्याच्या तक्रारीही आहेत. कबुतरांनीही झाडांचा आश्रय सोडून खिडकीतल्या ग्रील्समध्ये बस्तान मांडलं. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींसह लहान मुलांनाही पटकन संसर्ग होतो.
>फुफ्फुसाबाबत पुण्यात कार्यशाळा
फुफ्फुसविकार आणि थोरॅसिक सर्जरी यासाठी आवश्यक ती सर्वोत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने व याबाबत डॉक्टर, नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पुण्यात ‘लंग डिसीजेस व फुफ्फुस विकार’ या विषयावर २८ आणि २९ आॅक्टोबर रोजी होणा-या इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅफ इंटरस्टिशिअल आयोजिण्यात आली आहे.