पीक स्पर्धेला जिल्ह्यात वाढता प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:14 AM2021-09-16T04:14:01+5:302021-09-16T04:14:01+5:30
पुणे : खरिपातील पीक स्पर्धेचा जिल्ह्यातील प्रतिसाद वाढला आहे. मागील वर्षी स्पर्धेत २२० शेतकरी सहभागी झाले होते. यंदा ४९० ...
पुणे : खरिपातील पीक स्पर्धेचा जिल्ह्यातील प्रतिसाद वाढला आहे. मागील वर्षी स्पर्धेत २२० शेतकरी सहभागी झाले होते. यंदा ४९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे हे दुसरेच वर्ष आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे यासाठी राज्य सरकारने तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा ४ स्तरांवर ही स्पर्धा सुरू केली आहे. पीकनिहाय वेगवेगळी स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक पिकासाठी चारही स्तरावर रोख रकमेचे बक्षीस व उत्कृष्ट शेतकरी असे पारितोषिक आहे. यातील प्रमाणपत्राला शेतकरी वर्गात बरीच प्रतिष्ठा आहे. त्यामुळेच स्पर्धेला वाढता प्रतिसाद आहे. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात स्पर्धा घेतली जाते.
स्पर्धा परीक्षणासाठीचे पीकनिहाय क्षेत्र वेगवेगळ्या आकाराचे आहे. मात्र, सहभागासाठी त्या-त्या पिकाचे एकूण तालुक्यातील क्षेत्र किमान १ हजार हेक्टर असणे आवश्यक आहे. तालुक्यातील त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न काढणाऱ्या स्पर्धकाला विजेतेपद मिळते. त्यासाठी पीककापणीच्या वेळेस परीक्षण होते. ग्रामस्तरावरील समिती हे परीक्षण करते.
तालुका स्तरावरील नावे जिल्हा स्तरावर एकत्र होतात. त्यातून पहिले सर्वाधिक उत्पन्न काढणारे विभाग स्तरावर, त्यातील नावांमधून जास्त उत्पन्न मिळवणारे राज्य स्तरावर जातात व मग तिथून राज्य स्तरावरील नावे जाहीर होतात.
जिल्ह्यात या वेळी भात पिकासाठी सर्वाधिक म्हणजे २१९ स्पर्धक आहेत. त्यानंतर सोयाबीनसाठीही १२२ जणांनी सहभाग नोंदवला आहे. तालुका स्तरावरील पाहणी समिती लवकरच करणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.