IND vs AUS World Cup 2023 final: पुणेकर सामन्यात गुंग अन् ‘डिलिव्हरी बॉय’ सेवेत दंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 09:15 AM2023-11-20T09:15:33+5:302023-11-20T09:16:55+5:30
आज संपूर्ण पुणे शहर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यात दंग असताना स्वीगी, झोमॅटोसारख्या सुविधा देणाऱ्यांनी मात्र आपले कर्तव्य निष्ठेने बजावले....
पुणे : आपण घरात बसून फक्त एका क्लिकवर आणि आपल्या आवडत्या हॉटेलमधून आवडती डिश मागवतो. ऑनलाइन पेमेंटही होते. फार तर अर्ध्या तासात तुमच्या घराची बेल वाजते. तुमचा आवडता पदार्थ घेऊन तो दारात हजर. आज संपूर्ण पुणे शहर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यात दंग असताना स्वीगी, झोमॅटोसारख्या सुविधा देणाऱ्यांनी मात्र आपले कर्तव्य निष्ठेने बजावले.
अंतिम सामना असल्याने रविवारी संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण हाेते. मात्र, या दरम्यान स्वीगी, झोमॅटोसारख्या सुविधा देणाऱ्यांनी आपली सेवा सुरू ठेवली होती. कोणी पार्ट टाईम तर कोणी १२ तास काम करून जादा पैसे कमावत होते. इतर दिवशी ४०० ते ५०० रुपये कमाई होते. रविवारी मात्र लोकांचा प्रतिसाद चांगला असल्याने अनेकांना हजार रुपये कमाई झाली. त्यामुळे डिलिव्हरी करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याने चांगल्या ऑर्डर मिळतात. त्यातही रविवारी सामना असल्याने नागरिकांचा ऑर्डरसाठी प्रतिसाद वाढला. सामना असला तरी मला काम करावेच लागते. घरी बसून सामना पाहता येत नाही; कारण घरात पैसे कोण देणार? घरातला खर्च कोण भागवेल? त्यामुळे मॅच असो किंवा कोणताही विशेष दिवस मला काम करावेच लागते.
-नीलेश गुप्ता, झोमॅटो डिलिव्हरी बॉय