जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:12 PM2024-10-23T14:12:56+5:302024-10-23T14:43:30+5:30

व्यासपीठावर असलेले प्रवीण माने यांचे वडील आणि सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनाही यावेळी रडू कोसळलं.

indapur assembly seat Praveen mane emotion At the public meeting tears in his fathers eyes What exactly happened | जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?

जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?

Indapur Pravin Mane ( Marathi News ) : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर इंदापूरमध्ये पक्षाकडून त्यांना उमेदवारी निश्चित झाली. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापुरातील नेते प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. यातील प्रवीण माने हे आज इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रवीण माने हे भावनिक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. व्यासपीठावर असलेले त्यांचे वडील आणि सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनाही यावेळी रडू कोसळलं.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत बोलताना प्रवीण माने म्हणाले की, "आज सकाळी मी लवकर घरातून बाहेर पडलो आणि आमच्या कुलदैवतासह विविध देवांचे दर्शन घेण्यासाठी गेलो. घरातून बाहेर जाताना घरी कोणीही नव्हतं, पण मी जेव्हा दर्शन घेऊन घरी आलो तेव्हा माझी गाडीही गेटमधून आत जात नव्हती इतकी गर्दी जमली होती. लोकांचं हे प्रेम बघून माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं," असं प्रवीण माने यांनी म्हटलं. जाहीर सभेत हा प्रसंग सांगताना माने पुन्हा भावनिक झाले आणि हुंदका देऊन रडू लागले. त्यानंतर उपस्थित समर्थकांनी प्रवीण माने तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ... अशा घोषणा देत माने यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

"जनतेच्या ताकदीने निवडणूक लढवणार"

प्रवीण माने यांनी आपण यंदा कोणत्याही स्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. "११ तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर आम्ही विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वांनी एकमताने सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. आपल्या समोर शरद पवारसाहेबांचा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचाही पक्ष आहे. त्यांच्याकडे मोठमोठे नेते आहेत, संघटना आहे, गावोगावी पुढारी आहेत. आपल्याकडे फक्त तुमच्यासारखी सामान्य जनता आहे. याच जनतेच्या ताकदीच्या जोरावर आपण निवडणूक लढवणार आहोत," असं प्रवीण माने यांनी म्हटलं आहे.

इंदापूरचा सामना तिरंगी

माने कुटुंबाची इंदापूर तालुक्यात मोठी ताकद आहे. सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी मोठे जाळे विणले आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र ऐन मतदानाच्या तोंडावर अचानक त्यांनी सुळे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर माने यांनी अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. परंतु हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने प्रवीण माने यांचा पत्ता कट झाला. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण माने हे निवडणूक रिंगणात असणार आहेत.

Web Title: indapur assembly seat Praveen mane emotion At the public meeting tears in his fathers eyes What exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.