इंदापूर बायोडायव्हर्सिटी पार्क ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:19+5:302021-06-11T04:08:19+5:30
सागर शिंदे इंदापूर : इंदापूर शहराचा जुना कचरा डेपो असलेला परिसर, सध्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून हिरवाईने फुलला ...
सागर शिंदे
इंदापूर : इंदापूर शहराचा जुना कचरा डेपो असलेला परिसर, सध्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून हिरवाईने फुलला आहे. विविध प्रकारची आयुर्वेदिक व आकर्षक वृक्ष लावून अतिशय सुंदर असे बायोडायव्हर्सिटी पार्क निर्माण केले आहे. इंदापूरकरांना ह्या पार्कमधून स्वच्छ, सुंदर वातावरण पाहायला मिळत असल्याने इंदापूर शहराचा बायोडायव्हर्सिटी पार्क नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
इंदापूर नगरपरिषदेला राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता अभियानात २१ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवून देणाऱ्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांनी बायोडायव्हर्सिटीच्या उभारणीला सुरुवात केली. आजही पार्कमध्ये कामकाज उत्तम प्रकारे चालू आहे. यासाठी शहा नर्सरीच्या माध्यमातूनही वेळोवेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा विविध वृक्ष व रोपांची मदत करत असतात.
पूर्वी इंदापूर स्मशानभूमीच्या बाजूला रिकामे असलेल्या जागेत संपूर्ण शहराचा कचरा डेपो म्हणून प्रसिद्ध ठिकाण होते. स्वच्छ भारत अभियान या स्पर्धेत इंदापूर नगरपरिषदेने सक्रिय सहभाग घेतला व कर्मचारी जिद्दीने स्वच्छ सुंदर इंदापूर बनवण्यासाठी सज्ज झाले. जुना कचरा डेपो स्वच्छ करून त्या ठिकाणची स्वच्छता तसेच तेथील दगड-गोटे, प्लास्टिक कचरा, कुजलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी कसलेही टेंडर नगरपरिषदेने काढले नाही. नगरपरिषद कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने बायोडायव्हर्सिटीसाठी योगदान दिले. नवनवीन कल्पना राबवित मेहनत घेतली. आणि येथे नंदनवन फुलविले. तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी यांच्या वाढदिवसाचे वर्गणीतून आज जवळपास २५ हजार रुपयाची आयुर्वेदिक झाडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. यामध्ये पारिजातक, बेल, तुळस, भेंडा, आवळा, गवती चहा, अर्जुन, रक्तचंदन, कोरफड, शतावरी, अडुळसा, पानफुटी, इन्सुलिन, बकुळ, अक्कलकारा, जास्वंद, कापूर तुळस, आंबा, सीताफळ, जांभूळ, चिंच, विलायची चिंच, लिंब, पिंपळ, वड, लिंबू, व्हाईट एप्पल, वाळा, मेंट (फ्रेशनर), गुलाब, मोगरा आदी प्रकारच्या औषधी व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. नगरपरिषद कर्मचारी यांच्या काष्टातून जुना कचरा डेपोचे रूपांतर सुंदर अशा आयुर्वेदिक बगीचा मध्ये करण्यात आला आहे.
इंदापूरला ग्रीन सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न
इंदापूर शहराला नागरिकांच्या सहकार्यातूनच राष्ट्रीय पातळीवर एक स्वच्छ, सुंदर इंदापूर म्हणून बक्षीस व नावलौकिक मिळाले. सध्या शहरातील ज्या ठिकाणी शासकीय रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आम्ही विविध प्रकारचे झाडे लावून शहराला जास्तीत जास्त नैसर्गिक प्राणवायू (ऑक्सिजन) देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, भविष्यात इंदापूर शहराला जागतिक पातळीवर ग्रीन सिटी म्हणून दर्जा मिळवून देण्याचे आमचा प्रयत्न आहे.
अंकिता शहा
नगराध्यक्षा, नगरपरिषद
१० इंदापूर
इंदापूर शहरातील जुना कचरा डेपो आयुर्वेदिक बगीचाच्या हिरवाईने नटला.