इंदापुरात दोन्ही काँग्रेसचा वर्चस्वाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:23 AM2018-09-28T00:23:45+5:302018-09-28T00:24:01+5:30
इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला.
काटी/इंदापूर - इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आमच्या पक्षाचे जास्त सरपंच विजयी झाल्याचे दावे केले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने १० ग्रामपंचायतींध्ये तर काँग्रेसने ६ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘जनतेने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पक्षाच्या विचाराचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यात शेळगांव ,अगोती नंबर १ , अगोती नंबर २, वडापुरी ,तरटगाव ,बोराटवाडी, कालठण नंबर २ ,गोखळी, पंधारवाडी, खोरोची या गावात विजयी झाले आहेत. ’दुसरीकडे कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांनीही इंदापूरात कॉग्रेसच्या ग्रामपंचायत संख्येत वाढ झाल्याचे सांगितले आहे. यादव यांनी सांगितले की,‘ काँग्रेस पक्षाने ५ ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे विजय मिळविला आहे. तर तरटगाव ग्रामपंचायत बिनविरोध होऊन तेथे सर्वपक्षीय सत्ता आली आहे. निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडील ग्रामपंचायतींच्या संख्येत वाढ झाली असून काँग्रेसकडील एकुण ग्रामपंचायत सदस्य संख्येतही सुमारे ३१ ने वाढ झाली आहे. कांदलगाव, कालठण नं.१, खोरोची, उद्धट , पवारवाडी या ग्रामपंचायती कॉग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने निर्विवाद जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक ग्रामपंचायत गमवावी लागली आहे. तर काँग्रेसने एक जादा ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढला असल्याचे दिसून येत आहे.’
निवडणूक झालेल्या १३ ग्रामपंचायतींपैंकी कांदलगाव, कालठण नं.१, कालठण नं.२, बोराटवाडी, खोरोची, गोखळी, शेळगाव, वडापुरी, पवारवाडी या ९ ग्रामपंचायती यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. तर अगोती नं.-१,अगोती नं.२ , पंधारवाडी, उध्दट या ४ ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाकडे होत्या.
धक्का आणि यश
शेळगांव ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र हे कर्मयोगी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. कारखान्याचा कामगार, संचालक वर्ग मोठ्या प्रमाणात मतदार आहे.सरपंच पदासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना उमेदवारी देवूनही व अगोती नंबर २ या गावात चाळीस वर्षांपासून कॉग्रेस पक्षाची म्हणजेच कर्मयोगी शंकरराव पाटील कारखानाचे माजी संचालक बलभीम काळे व विद्यमान संचालक सुभाष काळे यांची सत्ता होती. तरीदेखील हर्षवर्धन पाटलांचा सरपंच विजयी होऊ शकला नाही हा कॉग्रेसला मोठा धक्का आहे. तर कांदलगाव ग्रामपंचायतीमध्ये गेली चाळीस वर्षे कॉग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील यांची सत्ता होती. मागील निवडणूकीत राष्ट्रवादीच्या युवकांनी सत्तांतर घडवले होते. यंदा पुन्हा ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यातून खेचून घेण्यात कांग्रेसला यश मिळाले आहे.
बोराटवाडीत काँग्रेसचा धुव्वा
रेडणी : बोराटवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत जय भवानी ग्रामविकास पॅनलने निर्विवाद विजय मिळविला. सरपंचपदासह सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. पॅनलच्या दत्तू यशवंत सवासे यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांनी तुकाराम अनंत इंगवले यांचा २०६ मतांनी पराभव केला. सरपंचपदासाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. दत्तू सवासे यांना एकूण ७२४ मते मिळाली, तर तुकाराम अनंता इंगवले यांना ५१८ मते मिळाली. तिसरे उमेदवार समीर धर्मराज बर्गे यांना अवघी तेरा मते मिळाली.
जय भवानी ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार : प्रभाग १) हनुमंत पांडुरंग माने, रमेश शिवाजी बोराडे, पुष्पा शहाजी जाधव, प्रभाग २) अभिजित विठ्ठल फडतरे, मनीषा तुकाराम हेगडकर, शिवबा नवनाथ बोराडे, प्रभाग ३) धोंडीराम लक्ष्मण खाडे, वैशाली साहेबराव सवासे, पूनम धनाजी फडतरे.
देऊळगावराजे ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे वर्चस्व
देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देऊळगावराजे ग्रामपंचायतीचा निकाल गुरुवार (दि.२७) रोजी लागला. या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात गटाचे वर्चस्व राहिले आहे. दरम्यान गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. दरम्यान सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच अमित गिरमकर यांनी केले होते. सिद्धेश्वर पॅनलला ८ जागा तर भैरवनाथ पॅलन आणि शिवछत्रपती भैरवनाथ पॅनल यांना प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले.
११ सदस्य संख्या असलेल्या या ठिकाणी वार्ड क्र. १ मध्ये एका जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने एक जागा रिक्त राहिली तर १० जागांसाठी तीन पॅनल मधील व एक अपक्ष असे ३0 उमेदवार रिंगणात होते. यामधे सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी सर्वाधिक आठ जागांवर सिद्धेश्वर ग्रामविकास पनलचे उमेदवार विजयी झाले, सरपंचपदासाठी सर्वाधिक ९९६ मते स्वाती अमित गिरमकर यांना मिळाली.
वार्डनिहाय विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते : वार्ड क्रमांक १ : जयश्री महादेव सूर्यवंशी (२५८), वार्ड क्रमांक २ : नारायण महादेव गिरमकर(२६१), शुभांगी दादासाहेब गिरमकर (३२०), पंकज देवीदास बुहार्डे (३४०), वार्ड क्रमांक ३ : दयाराम श्रावण पोळ (२५२), सुलोचना शिवाजी तावरे (१५९), चतुराबाई आप्पासाहेब खेडकर (२६३), वार्ड क्रमांक ४ : बाबू नारायण पासलकर(२८९), सोनाली दिपक पासलकर (२९५), वृषाली महादेव औताड़े (२८७), हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी गुणगौरव केला. विजयानंतर सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
गावाचा विकास केला जाईल
सरपंचपदाच्या विजयी उमेदवार स्वाती गिरमकर म्हणाल्या की, ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, या विश्वासाला पात्र राहून सर्व समाजातील घटकांना पुढील काळात योग्य न्याय देऊन गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल.