इंदापुरात माजी सैनिकाचा अर्धा एकर ऊस जाळला; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:03 PM2017-11-21T13:03:54+5:302017-11-21T13:21:24+5:30
माजी सैनिकाचा अर्धा एकर ऊस जाळून डाळिंबाची ८२ झाडे तोडली. विहीरीतील शेतीपंप व ठिबक संचांच्या फिल्टरची तोडफोड केल्याच्या आरोपावरुन कालठण नं. २ येथील दोघांवर सोमवारी (दि. २०) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इंदापूर : माजी सैनिकाचा अर्धा एकर ऊस जाळून डाळिंबाची ८२ झाडे तोडली. विहीरीतील शेतीपंप व ठिबक संचांच्या फिल्टरची तोडफोड केल्याच्या आरोपावरुन कालठण नं. २ येथील दोघांवर सोमवारी (दि. २०) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शीलपुष्प भिकू भोसले, विशाल बाळासाहेब रेडके (दोघे रा. कालठण नं. २, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहे. विजयकुमार घनश्याम चव्हाण (रा. कालठण नं.२) या माजी सैनिकाने त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इंदापूर अर्बन बँकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात. त्यांची कालठण नं. २ येथे जमीन गट क्र.४२/९ मध्ये दोन एकर जमीन आहे. त्यामध्ये अर्धा एकर ऊस व एक एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. रविवारी आपल्या भाचीच्या लग्नासाठी ते सहकुटुंब नाशिकला गेले होते. येथून परतत असताना रविवार मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या बांधकऱ्याचा फोन आला. त्याने फिर्यादीस ऊसाला आग लागल्याचे सांगितले. फिर्यादी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शेतात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या अर्ध्या एकर ऊसाला लागलेली आग ग्रामस्थ वाढवत असताना दिसले. डाळिंबाची ८२ झाडे तोडल्याचे, विहीरीतील शेतीपंप व ठिबक संचांच्या फिल्टरची तोडफोड केल्याचे पाहणीत आढळले. त्यावेळी माहिती घेताना वरील आरोपींनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत हे नुकसान केल्याचे फिर्यादीस समजले. त्यानंतर त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली.
आरोपींपासून भविष्यात जीवितास धोका असल्याचे ही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.