इंदापूर महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे ४२ लाख रुपये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:18+5:302021-05-07T04:12:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : राज्यातील पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेली अनामत रक्कम महाविद्यालायांकडेच कोट्यवधी रुपये जमा ...

Indapur College students lost Rs 42 lakh | इंदापूर महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे ४२ लाख रुपये पडून

इंदापूर महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे ४२ लाख रुपये पडून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : राज्यातील पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेली अनामत रक्कम महाविद्यालायांकडेच कोट्यवधी रुपये जमा असल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये इंदापूर महाविद्यालयाकडे जवळपास ४३ लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी सहसंचालक उच्च शिक्षण पुणे विभागाकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अनामत रकमेची माहिती मागितली होती. त्यामधून ही माहिती उघड झाली आहे.

अमर एकाड यांनी याबाबत माहिती उजेडात आणल्याने प्रशासन खडखडून जागे झाले आणि पुणे विभागातील सर्व १६८ अनुदानित महाविद्यालयांना अनामत रकमेची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च शिक्षण सहसंचालक पुणे यांच्या कार्यालयाने दिले. महाविद्यालयाचे नाव आणि २००५ ते २०२० पर्यंत एकूण जमा झालेली अनामत रक्कम, विद्यार्थ्यांना परत केलेली अनामत रक्कम, आणि एकूण शिल्लक अनामत रक्कम तपशील सादर करावे लागेल. तसेच, शिल्लक अनामत रकमेतून महाविद्यालयाने केलेला खर्च आणि त्यासाठी सहसंचालक कार्यालयाची परवानगी घेतली असल्याची प्रतही सादर करणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे. असा आदेश काढला.

त्यामध्ये इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर (आय कॉलेज) यांच्याकडे २००५ ते २०२० पर्यत एकूण जमा झालेली अनामत रक्कम ५० लाख २८ हजार ४९० रुपये होती. त्यातील विद्यार्थ्यांना केवळ ७ लाख ४८ हजार ७२७ रुपये अनामत रक्कम परत केली आहे. मात्र २००६ पासून २०२० पर्यंत प्रत्येक वर्षाची वेगवेगळी रक्कम शिल्लक असून, सध्या एकूण शिल्लक अनामत रक्कम ४२ लाख ७९ हजार ७६३ रुपये महाविद्यालयाकडे शिल्लक आहेत. अशी माहिती अधिकारातून प्राचार्य डॉ. संजय चकणे यांनी दिली आहे.

यामध्ये शिल्लक असलेल्या अनामत रक्कमेचा विनियोग गरजू ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करणे आवश्यक आहे. ईबीसी विद्यार्थी पैशांअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना खालीलप्रमाणे आर्थिक सहकार्य करणे अपेक्षित आहे, त्यामध्ये वसतिगृह व मेस शुल्क, शैक्षणिक साहित्त्यामध्ये वह्या, पुस्तके, दफ्तर आदी सुविधा, वैद्यकीय सुविधा, कमवा व शिका योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, अशा चार गोष्टींना खर्च करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते अमर एकाड यांनी शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.

राज्यातील सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित ३१४१ महाविद्यालयांनी शिल्लक असलेली एकूण अनामत रकमेच्या (रिफंडेबल डिपॉझिट) ३० टक्के रक्कम ईबीसी विद्यार्थ्यासाठी खर्च करण्याबाबतचे परिपत्रक तत्काळ काढून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी संचालक व सर्व विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांच्याकडे केली आहे.

चौकट : विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास तत्काळ अनामत रकमेचे वितरण करण्यात येते

इंदापूर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, अनेक विद्यार्थ्यांना अनामत रक्कम घेऊन जाण्याबाबत नोटीस काढले जाते. त्या वेळी विद्यार्थी अनामत रक्कम घेऊन जात नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे अनामत रक्कम मागितल्यास आम्ही त्यांना तत्काळ वितरण करतो, अशी माहिती इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.

चौकट : अन्यथा बँक व्याजदराप्रमाणे विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करा

महाविद्यालयात शिकणाऱ्या ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला, शिल्लक असणाऱ्या अनामत रक्कम महाविद्यालयांनी खर्च करावी. अन्यथा महाविद्यालयाकडे सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते नोंदीत आहेत. ज्यांची अनामत रक्कम महाविद्यालयाकडे शिल्लक आहेत त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात, आजपर्यंतच्या शिल्लक ठेवलेली रक्कम बँक व्याजदराप्रमाणे जमा करावेत.

अमर एकाड - अध्यक्ष कॉप्स विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य

फोटो ओळ : इंदापूर महाविद्यालय, इंदापूर

Web Title: Indapur College students lost Rs 42 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.