इंदापूरात कोयत्याच्या धाकाने दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारासह चार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:46 PM2021-05-14T17:46:21+5:302021-05-14T17:46:28+5:30
इंदापूर पोलिसांच्या दक्षतेमुळे आरोपी दोन तासात जेरबंद.
बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळी दुचाकीस्वाराच्या मोटरसायकल समोर कार आडवी लावली. त्यानंतर कोयत्याच्या धाकाने पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकीस्वाराकडील रोख रक्कम व मोबाईल लुटून फरार झाल्याची घटना घडली होती. याबाबत विकास बबन शिंदे रा आडसूळवाडी यांनी इंदापूरपोलिसात फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य पाहून इंदापूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात एका अट्टल गुन्हेगारासह चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केल्यावर १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
राहुल बाळासाहेब पवार.(वय२२) , दिनेश उर्फ मयुर महेंद्र दाईंजे (वय २०), विवेक पांडुरंग शिंदे (वय २०), सागर नेताजी बाबर (वय १९) सर्व रा. इंदापूर रा. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून एक आरोपी फरार आहे.
विकास शिंदे हे आजारी असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यावरून आडसुळवाडी येथे चालले होते. गुरुवारी पहाटे ५:३० वाजता सरडेवाडी टोल नाका पास केल्यावर सोनाई पेट्रोल पंपाजवळ कारने त्यांना अडवले. गाडीतून उतरलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी शिंदे यांना मारहाण केली. व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून ३ हजार रूपये, मोबाईल असा एकूण ४ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची सुत्रे हलवली. हिंगणगाव येथे गोकुळ हाॅटेलजवळ सापळा रचून अवघ्या दोन तासात चार आरोपीना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे हे करत आहेत.
राहुल पवार याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद
आरोपी राहुल बाळासाहेब पवार याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे. त्याच्यावर इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत कलम ३०७ अन्वये दोन गुन्हे दाखल आहेत. कलम ३९५ अन्वये तीन गुन्हे दाखल झाले असून इंदापूर पोलीस स्टेशनअंतर्गत एकुण ५ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.