यंदा इंदापूरला भासणार नाही पाण्याची चणचण; उन्हाळा तालुक्याला लाभदायक ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:44 PM2020-05-14T15:44:17+5:302020-05-14T15:45:25+5:30
यावर्षी शेती, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार नाही..
इंदापुर (कळस) : गेल्या वर्षी परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला. मात्र, या पावसामुळे अर्धवट राहिलेली धरणे ओव्हरफ्लो झाली त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा राहिला. यामुळे इंदापुर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. ऐन उन्हाळ्यात खडकवासला, निरा डावा कालव्यावरील आवर्तने चालु राहिली. पिण्याच्या पाण्यासाठी गेल्यावर्षी तब्बल ६६ टँकर होते. यंदा मात्र मुबलक पाण्यामुळे टँकरची गरज भासणार नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तालुक्याला लाभदायक ठरणार आहे.
इंदापुर तालुक्यात सिंचनासाठी खडकवासला धरणसाखळी व भाटघर, विर धरणाच्या माध्यमातून पाणी येते. तसेच उजनी जलाशयावरुन मोठ्या प्रमाणावर सिंचन होते. या सर्व धरणांमध्ये चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे खडकवासला कालवा व निरा डावा कालव्यावरील यावर्षी शेतीसिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा व जनावरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. इंदापुर तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. मान्सून पुर्व व मान्सुन पाऊस तालुक्यात नेहमी कमीच प्रमाणात होतो.
हमखास टँकरची मागणी असणाऱ्या इंदापुर तालुक्यात उन्हाळ्याचे काही महिने पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. गतवर्षी सुमारे ६६ टँकरच्या माध्यमातून दररोज २१० खेपा करुन पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामध्ये ४४ गावे व ६१ वाड्यावस्तीवरील १ लाख ३० हजार ३९५ लोकसंख्येचा समावेश होता. तसेच ७०९९ जनावरांना देखील पाणी पुरवठा करण्यात येत होता, त्याचबरोबर १० विहीरी व ९ बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आले होते.
मात्र, यंदा पाण्याच्या मुबलकतेमुळे टँकरच्या पाण्याची मागणी झालेली नाही. अद्याप एकही टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४५० मिलीमीटर आहे. मागील वर्षी पावसाने ही सरासरी ओलांडली होती त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही.
सध्या जिल्हात भोर, हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव या पाच तालुक्यात २१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पावसाळा सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी राहीला असल्याने इंदापुर तालुक्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
..................
टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे अजुन तरी आले नाहीत. मान्सुनने ओढ दिली तर जुनमध्ये अडचण येईल. मात्र, सध्या तरी तालुक्यात टँकर मागणी नाही. गेल्यावर्षी ६६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी समाधानकारक परिस्थिती स्थिती आहे. दाऊद शेख,सहाय्यक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती,इंदापुर