‘बुलेट ट्रेन’बाबत इंदापूरच्या नेत्यांचे दिल्लीत बस्तान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:38+5:302021-07-29T04:10:38+5:30
लासुर्णे : मुंबई-हैद्राबाद हायस्पीड रेल्वे(बुलेट ट्रेन)केंद्र सरकारचा महत्त्वाकांशी प्रस्तावित मार्ग इंदापूर तालुक्यातील बागायती भागातील १३ गावांतून जाणार असल्याने ...
लासुर्णे : मुंबई-हैद्राबाद हायस्पीड रेल्वे(बुलेट ट्रेन)केंद्र सरकारचा महत्त्वाकांशी प्रस्तावित मार्ग इंदापूर तालुक्यातील बागायती भागातील १३ गावांतून जाणार असल्याने या भागातील शेती व्यवसाय कोलमडणार आहे. याबाबतचे लेखी निवेदन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील व राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी नवी दिल्ली येथे दिले.
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन (हायस्पीड रेल्वे) पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांतून जाणार आहे. या बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, बागायती शेतीचे नुकसान होऊ नये असा रेल्वे मार्ग निवडावा. संपादित जमिनीला चांगला मोबदला देण्यात यावा, असे निवेदन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे सोमवारी (दि. २६) दिले. या वेळी त्यांचेशी सविस्तरपणे चर्चाही केली. याप्रसंगी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. दरम्यान, बागायती शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा बुलेट ट्रेनचा मार्ग असेल, संपादित जमिनीस समाधानकारक मोबदला दिला जाईल, तसेच रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा बैठक घेऊ, अशी ग्वाही या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिष्टमंडळास दिली.
-------------------------
केंद्र सरकारचा मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा आदी तालुक्यांतून जात असल्याने तेथे सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. इंदापूर तालुक्यात एकूण चार प्रस्तावित मार्गाचे रेल्वेने सर्वेक्षण केले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
रावसाहेब दानवे यांना निवेदन देताना हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर व पृथ्वीराज जाचक.
२८०७२०२१-बारामती-०३