इंदापूर-माळशिरसच्या शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आंदोलन
By admin | Published: March 9, 2017 04:11 AM2017-03-09T04:11:06+5:302017-03-09T04:11:06+5:30
इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील
बावडा : इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तातडीने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्यास कोरड्या नदीपात्रात उपोषण करण्याचा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला.
नीरा नदीवरील बंधाऱ्यांचे ढापे टाकण्याचे व्यवस्थापन १५ आॅक्टोबर १६ रोजी सुरू करण्यात आले. त्यामुळे नदीतील पाणी बंद झाले. परिणामी नीरा नदीवरील सर्व बंधारे पूर्णक्षमतेने भरले गेले नव्हते. याच गोष्टींचा विचार करून, पुणे पाटबंधारे अंतर्गत येणारे सर्व बंधारे पूर्णपणे भरून दिले. परंतु, नीरा उजवा कालवा फलटण यांच्या अंतर्गत येणारे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील बोराटवाडी चाकाटी, आनंदनगर, अकलूज, सराटी, लुमेवाडी, गोंदी व ओझरे हे बंधारे कोरडेठाक राहिले. अनेकदा अर्ज, विनंत्या करूनही फलटण येथील संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या परिसरात नदीकाठी येणारी माळशिरस तालुक्यातील बांगारडे, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, आनंदनगर, अकलूज, माळीनगर, गणेशगाव, तांबवे, बिजवडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, नीर-निमगाव, कचरवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, गिरवी आदी आदी गावांमधील शेती पाण्याअभावी धोक्यात आली. या संपूर्ण परिसरात नीरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे.
पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बावडा मंडल अधिकारी एस. टी. लोखंडे यांनी या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी तहसीलदार पाटील यांनी आपली मागणी शासनापर्यंत निश्चितपणे पोहोचवून लवकरच याविषयी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन पाठपुरावा करू, असे सांगितले.
या निवेदनावर अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती प्रदीप जगदाळे, दत्तात्रय घोगरे, हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, समाधान बोडके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. (वार्ताहर)
त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांचे ऊस जे कारखाने नेतात त्या संबंधित कारखान्यांनीदेखील या बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासंबंधी लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी; अन्यथा भविष्यात इथला शेतकरी उसाचे एक टिपरू देखील या कारखान्यांना देणार नाही.
- अप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती