Swachh Bharat Abhiyan: इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळवले; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:52 PM2021-11-19T18:52:31+5:302021-11-19T18:54:48+5:30
इंदापूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेचा देशात आदर्श पॅटर्न निर्माण करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे
बारामती : स्वच्छ सुंदर शहर या उल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचा व इंदापूर नगरपरिषदेचा विशेष गौरव होणार आहे. इंदापूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेचा देशात आदर्श पॅटर्न निर्माण करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे, अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नगराध्यक्ष अंकिता शहा तसेच सर्व नगरसेवक नगरपरिषदेचे कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेच्या संदर्भात विशेष उपक्रम राबवित सलग देशपातळीवरील चौथ्यांदा नावलौकिक मिळवला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण कचरामुक्त शहराचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये इंदापूर नगरपरिषदेचा सन्मान होणार आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर नगर परिषदेने शहर स्वच्छतेच्या संदर्भात सलग दरवर्षी विविध उपक्रम राबवत स्वच्छतेचा जनजागृतीचा आदर्श पॅटर्न निर्माण केला आहे. यामध्ये नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच इंदापूर शहरातील नागरिकांनी या अभियानामध्ये विशेष सहभाग नोंदवत आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला. या प्रयत्नाचे फळ म्हणजे इंदापूर नगरपरिषदेला सलग या स्पर्धेत यशस्वी होत आले. या उपक्रमात सहभागी घेतलेल्या सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो.
शहर स्वच्छतेचा हा उपक्रम असाच पुढे ठेवून आपल्या कार्याचा नावलौकिक वाढवावा. नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक भरत शहा गटनेते कैलास कदम तसेच सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी रामराजे कापरे तसेच नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रयत्नपुर्वक कार्यामुळे हे यश संपादन करता आले. राष्ट्रपतींच्या हस्ते नगरपरिषदेचा गौरव होणार असल्याने इंदापूर नगर परिषदेने शहर स्वच्छतेचा आदर्श पॅटर्न असा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे.