इंदापूर डाळिंब बाजारात पंधरा दिवसांत २ कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:16+5:302021-09-03T04:10:16+5:30
रविकिरण सासवडे बारामती : सततच्या वातावरण बदलामुळे डाळिंब उत्पादकांना चिंतेत टाकले असले. तरी इंदापूर येथील डाळिंब बाजारामध्ये मागील ...
रविकिरण सासवडे
बारामती : सततच्या वातावरण बदलामुळे डाळिंब उत्पादकांना चिंतेत टाकले असले. तरी इंदापूर येथील डाळिंब बाजारामध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये ८२ हजार कॅरेटची आवक झाली होती. या तब्बल २ कोटी ९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. डाळिंबाला उच्चांकी १५१ रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे बहरात असलेल्या डाळिंब बागांना मोठा फटका बसला होता. या काळात सततच्या पावसाचा डाळिंब बागांना फटका बसल्याने फुलगळ, फळकूज, यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात ३० टक्क्यांहून अधिक घट झाली. तसेच पावसामुळे फवारण्या वेळेत करता आल्या नाहीत. परिणामी डांबऱ्या, बुरशीमुळे डाळिंब फळांची गुणवत्ता घटली होती. परिणामी डाळिंब बाजारामध्ये डाळिंब पाहायला मिळत नव्हते. ६ महिन्यांच्या खंडानंतर १५ जुलै २०२१ रोजी इंदापूर येथील डाळिंब बाजार मोठ्या जोमाने सुरू झाला. इंदापूर येथे माढा, करमाळा, माळशिरस, श्रीगोंदा, कर्जत, दौंड, पंढरपूर आदी भागातून मोठ्या प्रमाणात डाळिंब विक्रीसाठी येत आहे. तसेच येथून आंध्रप्रदेश, विजयवाडा, हैदराबाद, बरेली, उत्तर प्रदेश, दिल्ली, पुणे आणि मुंबई भागामध्ये डाळिंब जात असल्याने मोठी बाजारपेठ डाळिंब उत्पादकांना इंदापूर येथील डाळिंब बाजारमुळे उपलब्ध झाली आहे.
सध्या वारंवार वातावरण बदलत असल्याने डाळिंबावर तेल्या, मर, कूज, डांबऱ्या आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी रोगग्रस्त फळांना कमी दर मिळत आहे. १० रुपये किलोपासून ते उच्च गुणवत्तेच्या फळांना १५१ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
बारामती उपविभागातील पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांत कोरडवाहू शेतीचा आधार म्हणून डाळिंबाचे पीक घेतले जाते. बारामती उपविभागात सुमारे ११ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे पीक घेतले जाते. यापैकी एकट्या इंदापूर तालुक्यातच ८ हजार हेक्टरच्या वर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. त्याखालोखाल पुरंदर, बारामती, दौंड क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. डाळिंबामध्ये प्रामुख्याने मृग, हस्त आणि अंबिया असे तीन बहार धरले जातात.
इंदापूर डाळिंब बाजारामध्ये दररोज आवक होत आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंबा फळांना प्रतिकिलो १५१ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तेल्या, फळकुज, डांबऱ्या आदी रोगांमुळे डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
- वैभव दोशी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर
------------------------------
इंदापूर डाळिंब बाजारातील मागील
पंधरा दिवसांमधील उलाढाल (१५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट)
आवक - ८२ हजार कॅरेट
उलाढाल - २ कोटी ९ लाख
दर- १० रुपये ते १५१ रुपये