पालखी स्वागतासाठी इंदापूर सज्ज
By Admin | Published: June 27, 2017 07:42 AM2017-06-27T07:42:19+5:302017-06-27T07:42:19+5:30
संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी इंदापूरनगरी सज्ज झाली आहे. पालखी मुक्कामातील आकर्षणाचा केंद्रबिंदू
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी इंदापूरनगरी सज्ज झाली आहे. पालखी मुक्कामातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या रिंगण सोहळ्याचे मैदानही अश्वांच्या टापा झेलण्यास तयार झाले आहे.
उद्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रतिवर्षाप्रमाणे इंदापूर-बारामती रस्त्याने संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे शहरात आगमन होईल.
श्रीरामवेस नाक्यावर स्वागत झाल्यानंतर रिंगण सोहळ्याकरिता ती काही काळ नजीकच्या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या पटांगणात थांबणार आहे. त्यानंतर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमधील पटांगणात विश्रांतीसाठी जाईल. त्या ठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव मुकुंद शहा, सहसचिव अॅड. मनोहर चौधरी, विलासराव
वाघमोडे आदींनी आज त्या ठिकाणची पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा
अंकिता शहा यांनी जातीने लक्ष घालून नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व शहर स्वच्छ करून घेतले आहे. मुक्काम आटोपून पालखी इंदापुरातून अकलूजकडे निघते.
त्या प्रस्थानाच्या मार्गाच्या दुतर्फा असणारी अस्वच्छता, ज्योतिबाच्या माळालगतच्या मोकळ्या जागेत असणारा कचरा डेपो, दुर्गंधी यामुळे गेल्या दोन वर्षांत वारकऱ्यांमध्ये नाराजी होती. ती भावना लक्षात घेऊन नगर परिषदेने रस्त्याच्या दुतर्फा अत्तर फवारून, कनात बांधून प्रसंग निभावून नेला होता.यंदा मात्र नगर परिषदेने विक्रमी वेळेत कचरा डेपोभोवती संरक्षक भिंत बांधून घेतली. रस्त्याची दुरुस्ती व स्वच्छता करून या प्रश्नाचा कायमचा निकाल लावला आहे.