इंदापूरच्या विद्यार्थ्यांनी साधली ‘टिफीन पे चर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:13 AM2019-01-12T00:13:02+5:302019-01-12T00:13:28+5:30
मान्यवरांना आमंत्रण : राजकीय, सामाजिक विषयांवर गप्पा
इंदापूर : येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांतील ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजनेत काम करून शिक्षण घेणाऱ्या ६७ विद्यार्थ्यांनी ‘टिफीन पे चर्चा’ हा अनोखा उपक्रम सुरू करून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. दर गुरुवारी दुपारी महाविद्यालयात कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी आपले डबे (टिफीन) घेऊन टेरेस हॉल किंवा गार्डनमध्ये एकत्र येऊन स्नेहभोजन घेतात. या चर्चेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले जाते. भोजन करता-करता त्यांच्याशी चर्चा करून सामाजिक, आर्थिक, राजकीय यासारख्या विषयांवर हे विद्यार्थी ज्ञान मिळवीत आहेत.
महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, एकमेकांविषयी आपुलकी, आदर, प्रेम निर्माण व्हावे, कष्टातून पुढे आलेल्या लोकांचा सहवास, त्यांचा अनुभव, कामाची पद्धत, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि या योजनेचे समन्वयक प्रा. बाळासाहेब काळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना यावेळी एकत्रित स्नेहभोजनामधून वेगवेगळ्या २८ भाज्याांची मेजवानी मिळाली. ३२ देशांना भेटी दिलेल्या सरांचे अनुभव ऐकायला मिळाले. वर्गात बसून व्याख्यानाच्या एकेरीसंवादापेक्षा जेवणावळीतला हा दुहेरी संवाद प्रभावी ठरलाय या वेळी डॉ. शिवाजी वीर, प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. रवींद्र साबळे, प्रा. युवराज फाळके, प्रा. हर्षवर्धन सरडे हे उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी महेश मोहिते यांनी आभार मानले.
उपक्रमाच्या पहिल्याच चर्चेत इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना निमंत्रित करण्यात आले. त्यांना विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड कशी निर्माण झाली? सर्वांत आनंदाचा क्षण कोणता? प्रभावी वक्तृत्व कसे निर्माण झाले? परदेशातील अनुभव, परदेशातील शैक्षणिक पद्धती तेथील आहार तसेच पुणे ते दिल्ली सायकल प्रवास, वेगवेगळ्या किल्ल्यांवरचा अनुभव, डॉ. अब्दुल कलाम यांच्यासोबत आलेला अनुभव, भौतिकशास्त्र हा विषय कसा निवडला? जीवन जगताना केलेले कष्ट, विविध पदांवर काम करीत असताना वेळेचे नियोजन कसे करता? तसेच, प्रत्येक क्षण कसा जगता?’ असे एक ना अनेक विविध प्रश्न विचारले.