Anti Corruption Bureau: इंदापूरच्या तलाठ्याला बारामतीत मध्यरात्री १२ हजारांची लाच घेताना पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 10:41 IST2022-01-18T10:41:18+5:302022-01-18T10:41:35+5:30
हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच स्वीकारली

Anti Corruption Bureau: इंदापूरच्या तलाठ्याला बारामतीत मध्यरात्री १२ हजारांची लाच घेताना पकडला
पुणे : हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना इंदापूर तालुक्यातील एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री सापळा रचून पकडले. प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण भगत हा इंदापूर तालुक्यातील कुरवली गावाचा तलाठी आहे. तक्रारदाराने हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाची नोंद करण्यासाठी भगत याने १८ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केली असता तडजोड करुन १२ हजार रुपये लाच घेण्याचे कबुली दिली. भगत हा बारामतीमध्ये राहतो. त्याने तक्रारदार यांना लाचेचे पैसे घेऊन घरी बोलावले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास बारामतीतील भगत याच्या घराबाहेर सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच घेताना प्रवीण भगत याला रंगेहाथ पकडण्यात आहे.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा आयोजित करण्यात आला होता. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे किंवा १०६४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.