इंदापूर तालुक्यात आजपासून सात दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:57+5:302021-05-11T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाबधितांची आकडेवारी पाहता, इंदापूर तालुका व इंदापूर नगर परिषद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : इंदापूर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाबधितांची आकडेवारी पाहता, इंदापूर तालुका व इंदापूर नगर परिषद कार्यक्षेत्रात सोमवारी रात्री १ वाजल्यापासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश सोमवारी ( दि.९) प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले.
सोमवारी (दि. ९) मध्यरात्रीपासून ते सोमवारी (दि १७) पर्यंत तालुका बंद राहणार आहे. या निर्णयामुळे सोमवारी बाजारापेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यामुळे कोरोना नियमवालीचा फज्जा उडाला होता.
लॉकडाऊन काळात तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील ६५ वर्षांवरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग, एचआयव्हीबाधित रुग्ण असलेल्या व्यक्ती गरोदर महिला, वय वर्षे १० पेक्षा कमी वयोगाटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घरा बाहेर पडता येणार नाही.
तसेच सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, व सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने सात दिवस संपूर्णत: बंद राहतील. केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोहोच सेवेसाठी सुरू राहतील. सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावरही बंदी आहे.
उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (वंदे भारत योजने अंतर्गत कोविड १९ करिता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत: बंद राहतील. सर्व केशकर्तनालय, सलून, स्पा, ब्यूटीपार्लर इत्यादी दुकाने संपूर्णत: बंद राहणार आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे इंदापूर तालुक्यातील व इंदापूर नगरपरिषद क्षेत्रातील पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना या आदेशानुसार वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तुंचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक आदेशातून वगळली आहे.
निर्बंध पाळून
दूधविक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी ७ ते ९ वेळेत घरपोहोच सुरू राहील. सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे. पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील व ते केवळ शासकीय वाहने व
अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील. एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरू राहील.
दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था, तसेच डिजिटल, प्रिंटमीडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरू राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी ६ ते ९ या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील.पाणीपुरवठा करणारे टँकरला नियमानुसार परवानगी राहील. ___________________________________________________
चौकट : इंदापूर तालुक्यात कानाकोपऱ्यात पोलीस तैनात
इंदापूर शहरात ४ अधिकारी, ७ महिला कर्मचारी, ४० पोलीस कॉन्स्टेबल व ४० होमगार्ड असा तगडा बंदोबस्त इंदापूर शहरात असणार आहे. तालुक्यातील निमगाव केतकी, बावडा, वालचंदनगर, भिगवण व ग्रामीण भागात वेगळा असा तालुक्यातील कानाकोपऱ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पोलिसांचा असणार आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस हवालदार गणेश झरेकर यांनी सांगितले.