इंदापूर तालुका शेतकरी कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:18+5:302021-05-20T04:11:18+5:30
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध निमगाव केतकी : जलसंपदा मंत्री ...
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध
निमगाव केतकी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी व २२ गावांचे शेतीचे पाणी देण्याच्या मंजुरीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता उजनीचे पाणी चांगलेच पेटले आहे. निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदोलन करून या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
तत्पूर्वी येथील संत सावता माळी मंदिर प्रांगणात इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. या वेळी इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने प्रताप पाटील यांनी निषेध व्यक्त केला. पाटील म्हणाले की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादींच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यात येईल. त्यानंतर चर्चा करून इंदापूरच्या हक्काचे ५ टी.एम.सी. पाणी मिळविण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर देखील पाणी न मिळाल्यास सोलापूर जिल्ह्याल्या पिण्याच्या व शेती पाण्याच्या नावाखाली ऑक्टोबरनंतर जाणारे उजनीचे पाणी न्यायालयात जाऊन बंद करण्यात येईल असा इशारा प्रताप पाटील यांनी दिला. निमगाव केतकी येथील संत सावता माळी मंदिर प्रांगणात आज आयोजित इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते.
या वेळी इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संघर्ष करणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून २२ गावांना पाणी मिळण्याची आशा होती. पण, राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचे ऐकून आपल्या हक्काचे मिळालेले पाणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तो निर्णय पुन्हा होईपर्यंत तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा ढोले यांनी दिला.
अॅड. लक्ष्मण शिंगाडे यांनी नीरा - डावा व खडकवासला कालव्यातून आपल्या भागाला पुरेसे पाणी येत नाही, पुणे वाढते आहे. त्यामुळे भविष्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होईल. त्यासाठी सर्वांनी पेटून उठत राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी उभा राहा. राजकीय आंदोलनातून आपली ताकद दाखवत आपल्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे अॅड. शिंगाडे यांनी स्पष्ट केले.
या वेळी बाळासाहेब करगळ यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांना सांगितले की, येथून पुढे उजनीच्या ५ टी.एम.सी.पाणी मिळण्यासाठी इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या प्रत्येक आंदोलनास राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असावेत. जर उपस्थित राहिले नाही तर त्यांचे राजीनामे घ्यावेत.
या वेळी किरण बोरा सराफवाडी, सचिन सपकळ, निमगाव केतकीचे माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, दत्तात्रय घोगरे, अभिजित रणवरे, भजनदास पवार, रासपचे किरण गोफणे, सागर मिसाळ, बसपाचे दीपक भोंग, सावता परिषदेचे संतोष राजगुरू, नानासाहेब खरात यांची भाषणे झाली.
या वेळी काँग्रेसचे नितीन राऊत, तुषार भोंग, प्रहार संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष संजय राऊत, अमोल राऊत, माणिक भोंग, सुरेश बारवकर, अमोल हागडे, अतुल मिसाळ, दादा ठवरे पाटील, दादासाहेब शेंडे, संदीप भोंग, निमगाव केतकी सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच सचिन चांदणे, अॅड. सचिन राऊत,दत्तात्रय चांदणे, मच्छिंद्र चांदणे, संतोष जगताप यांच्या सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————
...आमदार यशवंत माने यांचा निषेध
इंदापूर तालुक्यातील रहिवासी आणि मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांनी इंदापूरच्या बाजूने उजनीच्या पाण्याबाबत ‘सपोर्ट’ केला नाही. उलट सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांबरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटण्यास जाऊन इंदापूरविरोधी भूमिका घेतली.त्यामुळे मोहोळचे आमदार यशवंत माने यांचा जाहीर निषेध करतो. त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात देण्यात येणाऱ्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांनी केली.
———————————
...रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी उजनीतील ५ टी.एम.सी. पाणी शेतीसाठी मिळालेच पाहिजे, असे म्हणत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत काही कार्यकर्त्यांनी हातातून काडीपेटी काढून त्याला धरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
—————————————
...राज्य शासनाचा निषेध, भरणेंचा जयजयकार
शेतकरी कृती समितीची काळ्या फिती दंडास बांधून महाराष्ट्र सरकार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जाहीर निषेध केला. इंदापूर - बारामती रस्ता संत सावतामाळी मंदिरासमोर निमगाव केतकी येथे रोखण्यात आला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जयजयकार,तर राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
—————————————————
फोटो ओळी -- निमगाव केतकी येथे रास्ता रोको करताना इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले , प्रताप पाटील व इतर शेतकरी .
१९०५२०२१ बारामती—०६
—————————————