इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे : श्रीमंत ढोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:37+5:302021-05-27T04:10:37+5:30
इंदापूर तालुक्यातील पाणीसंघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळ खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबई येथे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मंगळवार ...
इंदापूर तालुक्यातील पाणीसंघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळ खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबई येथे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मंगळवार ( दि. २५ ) रोजी भेटले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जलतज्ञ बाळासाहेब करगळ, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, नवनाथ रुपनवर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृती समितीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत ढोले म्हणाले की, पुणे शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे ही लोकसंख्या वाढत असताना, इंदापूर तालुक्याच्या वाट्याचे पाणी सतत कमी झाले आहे. उजनी धरण निर्मितीसाठी सोलापूर जिल्ह्यापेक्षा सर्वात मोठा त्याग इंदापूर तालुक्याचा आहे. जवळपास ३६ हजार एकर जमीन इंदापूर तालुक्याने या उजनी जलाशयासाठी अक्षरशः दान दिल्यासारखी दिली आहे. यामध्ये ३३ गावे गेलेली आहेत. यापैकी ज्या शेतकऱ्यांना पुनर्वसन करून सोलापुरात जिल्ह्यामध्ये जागा दिल्या. अशा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनी हिसकावून घेऊन त्यांच्यावर अरेरावी करून त्यांना इंदापूरला पळवून लावले आहे. ही यादी देखील आम्ही वेळ पडल्यावर प्रसिद्ध करणार आहोत अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.
उजनी धरणासाठी तालुक्याचा त्याग जास्त असल्यामुळे, आमच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.हे पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून शासनाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला देण्याची भूमिका आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील काही नेते उगीच हस्तक्षेप करतात त्यांनी हस्तक्षेप थांबवावा, अशी विनंती देखील शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी केली आहे.
सोलापूरमध्ये पुनर्वसन झालेल्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना द्या
शिष्टमंडळाची बाजू मांडताना जलतज्ज्ञ बाळासाहेब करगळ म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पुनर्वसन झाले आहे. तेथील जमिनी देखील आम्हाला पुन्हा मिळाल्या पाहिजेत व संबंधित अधिकार देखील कायम राहिले पाहिजेत. जी गावठाण सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी हिसकावून घेतले आहेत ती देखील आम्हाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजेत. असाही आग्रह जलतज्ज्ञ बाळासाहेब करगळ यांनी धरला आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यावाचून उपेक्षित ठेवले जाणार नाही .
सोलापूर जिल्ह्याचे उजनी धरणातील वाट्याचे जेेवढे टीएमसी पाणी आहे. यामध्ये कोठेही बाधा येणार नाही. परंतु इंदापूर तालुक्याला न्याय मिळणारच हक्काच्या पाण्यावाचून उपेक्षित ठेवले जाणार नाही. असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी मी शेतकरी शिष्टमंडळाला दिला आहे अशीही माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.
शेतकरी कृती समितीच्या वतीनेखासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देताना कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी.