इंदापूर तालुका मंगळवारपासून होणार अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:12+5:302021-05-16T04:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोनारुग्णांमुळे एका आठवड्याचे लॉकडाऊन लावले होते. काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोनारुग्णांमुळे एका आठवड्याचे लॉकडाऊन लावले होते. काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत असली, तरी त्यात कमी-अधिक प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. मंगळवार (दि. १८) पासून अनलॉक होणार असून नागरिकांना कोराेना नियमावलीचे कठोर पालन करावे लागणार आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, प्रतापराव पाटील, अतुल झगडे, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयारी झाली आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट भयंकर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या लहान बालकांची काळजी घ्यावी. उगाच बाहेर फिरणे टाळावे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
चौकट :
आपल्या लहान मुलांना रुग्णालयात पाहायला कोणत्याही आईला आवडणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपले पाहिजे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. आपल्या घरातील लहान मुलांना बाहेर जाऊ देऊ नये. आपल्यामुळे लहान मुलांना कोरोना झाला तर आपल्याला खूप वाईट वाटेल. कोणत्याही आईला आपल्या लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये पाहाणे आवडणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.
- अंकिता मुकुंद शहा - नगराध्यक्षा, इंदापूर नगरपालिका, इंदापूर
चौकट :
पोलिसांनी गर्दी आणि नियम मोडणाऱ्यांकडे लक्ष द्यावे
बारामती तालुक्यात ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने नियोजन करून, कडक लॉकडाऊन ठेवले आहे, त्याप्रमाणे इंदापूर शहरात कडक लॉकडाऊन होताना दिसले नाही. आता मंगळवारपासून अनलॉक आपण करीत आहोत. मात्र, पोलिसांनी यामध्ये अलर्ट राहायचे असून, नागरिकांची गर्दी अजिबात होऊ द्यायची नाही, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांचे कान टोचले.
फोटो ओळ : इंदापूर येथे आढावा बैठकीत बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.