दुसऱ्या डोससंदर्भात इंदापूरकर राहिले बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:57+5:302021-04-29T04:07:57+5:30
इंदापूर: संपूर्ण देशात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी प्रथम टप्पा म्हणून ४५ पेक्षा ...
इंदापूर: संपूर्ण देशात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी प्रथम टप्पा म्हणून ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना शासनाने मोफत लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले होते. त्या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील ८१ हजार ९८७ नागरिकांनी प्रथम लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील गावडे यांनी दिली. मात्र, दुसऱ्या डोससंदर्भात लोक बेफिकीर झाले आहेत. दुसऱ्या डोसची तारीख होऊन गेली तरी लोक केंद्रावर आले नाही. त्यामुळे आता गावोगावी जाणून दुसऱ्या डाेसचे लसीकरण प्रशासनाला पूर्ण करावे लागणार आहे.
इंदापूर तालुक्यात नवीन वर्षात १६ जानेवारी २०२१ रोजी प्रथम लसीकणाला सुरवात झाली. त्यामध्ये तालुक्यातील ४५ वयाच्या वरील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी एकूण दहा लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली होती. त्यामध्ये बावडा - ९,९९३, भिगवण - ८,७६२, बिजवडी - १०,५९२, कळस - ३,४५१, लासुर्णे - १०,१५७, निरवांगी - ९,६६६, सणसर - ११,३००, पळसदेव - १०,३३८, इंदपूर उपजिल्हा रुग्णालयात ६,६२१ व निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय १,१०७ या दहा ठिकाणी लसीकरण करण्यात आले यामध्ये एकूण ८१,९८७ नागरिकांना प्रथम लसीकरण केले आहे.
इंदापूर तालुक्यातील एकूण ९९ हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र त्यातील जवळपास ८२ हजार नागरिकांनी पहिला लसीचा डोस घेतला. म्हणजे साधारणपणे ८५ टक्के लसीकरण पहिल्या डोसचे पूर्ण झाले. मात्र ४२ दिवसानंतर, दुसऱ्या डोसला केवळ ४,६४६ नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी दिली.
सध्या उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात लसीकरण चालू आहे. तरीही आरोग्य सेवकांची टीम एका वेळेस ४८ गावांमध्ये लसीकरण करण्याचे काम करीत आहेत. लसीचा साठा संपल्यास तात्काळ पुरवठा शासनाच्या वतीने करण्यात येत असून, दुसऱ्या टप्प्यातील डोस नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे खरे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनी दुसऱ्या लसीकरणाला प्रतिसाद द्यावा
इंदापूर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक चांगली कामगिरी आरोग्य विभागाने केली असून, प्रथम टप्यात अधिष्ठापैकी जवळपास ८५ टक्के नागरिकांना प्रथम लसीकरण केले आहे. त्यातील अनेक नागरिक दुसऱ्या लसीकरण गांभीर्याने घेत नसून, त्यांनी दुसऱ्या लसीकरणाला प्राधान्य देवून, लस घेवून लसीकरणाला प्रतिसाद द्यावा. असे आवाहन इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रा. विजयकुमार परीट यांनी केले आहे.