इंदापूरच्या २२ गावांची पाण्याची अडचण होणार दूर
By admin | Published: October 25, 2016 06:08 AM2016-10-25T06:08:08+5:302016-10-25T06:08:08+5:30
इंदापुरातील २२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास पुणे पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
बारामती/निमगाव केतकी : इंदापुरातील २२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास पुणे पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांच्या पाण्यासंदर्भात असलेल्या अडचणी दूर होणार आहेत.
याबाबतचा आदेश काढताना नजरचुकीने चासकमानचा उल्लेख झाला, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी केले. राज्यपालांच्या अध्यादेशानुसार जलसंपदा विभागाच्या १ आणि २ उपविभागीय कार्यालयांचे सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतर केले. त्यामध्ये इंदापूरच्या सतत दुष्काळी २२ गावांच्या पाण्यासंदर्भात उल्लेख नव्हता. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. ‘लोकमत’ने २२ गावांच्या तोंडचे पाणी पळणार’ असे वृत्त आज प्रसिद्ध केले. या संदर्भात कपोले म्हणाले, ‘‘इंदापूरच्या डाव्या कालव्यासाठी पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत २२ गावांसह शेटफळ हवेली, बावडा आदी गावांना फायदा होण्यासाठी निमगाव केतकीत उपविभागीय कार्यालय सुरू होणार आहे. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ६० जणांचा स्टाफ मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या गावांना पाणी सोडण्यासाठी बारामतीच्या कार्यालयाशी संबंधित राहावे लागणार नाही. बारामतीचे नियंत्रण काढून निमगाव केतकीत स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होणार आहे, असे कपोले यांनी सांगितले. आदेशात चासकमानचा उल्लेख होता; परंतु तो चुकीचा असल्याने त्याबाबत शासनाकडून शुद्धीपत्रक काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जीवनातील जिव्हाळा असणारा घटक म्हणजे शेतीसाठी पाणी आणि त्यासाठी इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसह निमगाव केतकी, निमसाखरसह दुष्काळी २२ गावांतील शेतकऱ्यांची सिंचनाविषयी असलेली अनेक वर्षांपासूनची मागणी व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचनाविषय असलेल्या विविध अडचणी लक्षात घेऊन सतत पाठपुरावा करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे जलसंपदा विभागाकडून उपविभागीय कार्यालय मंजूर झाले आहे.
यापूर्वी बारामती कार्यालयातून पाण्याचा निर्णय होई. इंदापुरातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्याच्या मागणीसाठी बारामतीला यावे लागे. आता ही गैरसोय होणार नाही. एकाअर्थी इंदापूरला पाणी देण्याचा यापूर्वी निर्णय बारामतीतून होई. आता पाणी देण्याचा हक्क इंदापूर तालुक्यालाच मिळाला आहे. त्यामुळे बारामतीचे पाण्यावरील वर्चस्व संपुष्टात आले आहे. या संदर्भात आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले, की इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाविषय असलेले विविध प्रश्न हे मार्गी लागणार आहेत. या सध्या नव्याने मंजूर झालेल्या जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाबाबतीची सोय ही तालुक्यात होणार आहे.
शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद...
निमगाव केतकीत सुसज्ज कार्यालय, कामगार वसाहत, उभारणीसाठी मंजुरी मिळाली. त्यामुळे निमगाव केतकी गावात कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला. या वेळी निमगाव केतकी, निमसाखरसह तालुक्याच्या अन्य गावांतील शेतकरी उपस्थित होते. निमगाव केतकीमध्ये उपविभागीय कार्यालय व सुसज इमारत उभी राहणार असल्याने गावाच्या वैभवात भर पडणार आहेच; पण नीरा डावा कालवाही बारमाही व्हावा, अशाही अपेक्षा परिसरातील शेतकरी करीत आहेत.