इंदापूरचा ३० वर्षांपासून धगधगणारा पाणीप्रश्न पुन्हा ‘जैसे थे ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:52+5:302021-05-21T04:11:52+5:30

(सतीश सांगळे) लोकमत न्यूज नेटवर्क कळस: इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांनी बारमाही पाणीप्रश्नांबाबत लढा देऊनही ...

Indapur's water crisis, which has been raging for 30 years, is back to normal. | इंदापूरचा ३० वर्षांपासून धगधगणारा पाणीप्रश्न पुन्हा ‘जैसे थे ’

इंदापूरचा ३० वर्षांपासून धगधगणारा पाणीप्रश्न पुन्हा ‘जैसे थे ’

Next

(सतीश सांगळे)

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस: इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांनी बारमाही पाणीप्रश्नांबाबत लढा देऊनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहणार आहे.

नीरा डावा कालव्यावरील अंथुर्णेपासून शेटफळ हवेलीपर्यंत बावीस गावांच्या शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला. यामधून नीरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येऊन शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदायासमोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना उसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्षे पूर्ण झाली, तरी २२ गावांतील पाणीप्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले. त्या वेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली. विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणीनंतर कायम स्वरूपी योजना मंजूर करावी, अशी शिफारस झाली. त्यामुळे एकरी १५ गुंठ्यांऐवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नासाठी मोठी ताकद लावून उजनी धरणावरून ५ टीएमसी पाणी मंजूर केले. मात्र, सोलापूरमधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव, निमसाखर, रेडणी, निमगाव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी या गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे. मूळच्या अध्यादेशाप्रमाणे सणसर कटव्दारे मिळणारे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

——————————————

खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभी राहिल्यानंतर, २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगाव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते. मात्र, आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतु अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात खासदारांनी ताकद दिली नाही. तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात पक्षासाठी सोयीची भूमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

चौकट

खडकवासला कालव्यावरून नीरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरुवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, काही राजकारणीच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला. त्यावेळेपासून राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला वरदान ठरण्याऐवजी शापित ठरला आहे.

Web Title: Indapur's water crisis, which has been raging for 30 years, is back to normal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.