इंदापुरात तलाव झाले कोरडे, दुष्काळाची छाया गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:24 AM2017-11-29T02:24:51+5:302017-11-29T02:25:05+5:30
यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत.
अकोले : यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पाणीउपसा करण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गावोगावी पाहायला मिळत आहे. जलउपसा करण्याच्या घटकामध्ये मोठी वाढ झाल्याचे हे परिणाम दिसून येत आहे.
वाढती लोकसंख्या त्याचबरोबर पाणी वापराच्या प्रमाणातील वाढ यामुळे दिवसेंदिवस जलउपसा करण्याच्या प्रमाणात वाढ होताना जलस्रोताला बळकटी देण्याच्या प्रयत्नाला कोणी हातभार लावत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पाण्याची मोठी प्रमाणात गरज भासत असून याची गरज भागविण्यासाठी विहिरींची सोय करण्यात येत आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे महसुली नोंद असलेली कुटुंबे आहेत त्यांच्याकडे सरासरी एक विहिरीची नोंद आहे. याप्रमाणे तालुक्यात विहिरींबरोबरच घरगुती पाण्याच्या वापरासाठी घरासमोर बोअरवेलची पण सोय केलेली आहे. यामुळे दिवसेंदिवस पाणी उपसा करण्याच्या घटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याकारणाने भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.
बंधारे झपाट्याने कोरडे
चार महिन्यांपूर्वी जलयुक्त शिवाराच्या कामामुळे पाण्याने भरलेले बंधारे झपाट्याने कोरडे झाल्याचे चित्र तालुक्यातील गावोगावी पाहायला मिळत आहे. यावर्षी जास्त पाऊस होऊनदेखील पाण्याची समस्या आताच भेडसावत असल्याने अजून सहा महिन्यांत शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जलउपसा करण्याबरोबरच शेती व्यवसायासाठी ठिबक सिंचन, शोषखड्डे यावर भर देऊन जलस्त्रोत बळकट करण्याला हातभार लावण्याची गरज आहे. जेणेकरून जलउपसा करण्याचे स्रोत दिवसेंदिवस वाढतील. त्या प्रमाणात पाणीबचत करण्याची काळजी लोकांनी घेतली पाहिजे.