महाविद्यालयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन, शेरेबाजी; हिंजवडीत संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 01:51 PM2024-03-21T13:51:54+5:302024-03-21T13:52:22+5:30
संस्थेतील विद्यार्थिनीने याप्रकरणी १७ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक अरिंदम घोष (पिंपरी-चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला....
पिंपरी : हिंजवडीतील शिक्षणसंस्थेच्या चालकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन आणि शेरेबाजी केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज अलार्ड (पीआयबीएस) येथे १ ऑगस्ट २०२३ ते १७ मार्च २०२४ या काळात हा प्रकार घडला. संस्थेतील विद्यार्थिनीने याप्रकरणी १७ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक अरिंदम घोष (पिंपरी-चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीने २०२३ मध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यावेळी वर्गात २६ विद्यार्थी व ६ विद्यार्थिनी होत्या. १ ऑगस्ट रोजी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी घोष याने क्लास सुरू असताना पीडित विद्यार्थिनीला सर्व वर्गासमोर लज्जास्पद वर्तणूक दिली. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझेही मझ्यावर प्रेम आहे, हे मला माहीत आहे. तू नीट वाग आणि माझे ऐकत जा’, असे त्याने सांगितले. मात्र तो संस्थाचालक असल्याने तिने याची वाच्यता केली नाही. त्यानंतर काही दिवसांनी ती जीन्स पँट घालून गेली असता, ‘अशा जीन्स पँट घालून यायचे असेल तर लक्ष्मी चौकात जाऊन थांबा, तिथे लोक तुमच्याकडे पाहतील’, असे तो बोलला. यावेळी पीडितेच्या मैत्रिणी तिच्यासोबतच होत्या.
त्यानंतर महिन्याने ती आणि तिची मैत्रीण घोषकडे काही विषयांची माहिती घेण्यासाठी गेल्या असता, त्याने मुद्दाम हातात हात मिळविण्याचा प्रयत्न केला. ‘व्यवस्थित जवळ येऊन हँडशेक करायचा, तरच माझ्यावर तुझा विश्वास आहे, हे मला कळेल, मग मी तुला इंटर्नशिपला मदत करेन. तुला जॉब लागल्यावर ऑफिसमध्ये असेच करणार का?’ असे त्याने विचारले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीला, ‘तू ओठाला लिपस्टिक लावून मला इम्प्रेस करू नकोस, मार्कपण पाडून दाखव’, असे बोलून सर्वांसमोर अपमान केला. पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या मैत्रिणी प्रतिसाद देत नसल्याने घोष याने सर्वांना कमी गुण दिले. तिच्या घरी फोन करून ती महाविद्यालयात येत नाही, तिची संगत चांगली नाही, अशी तक्रार त्याने केली.