विविध मागण्यांसाठी तमाशा परिषदेतर्फे उद्या बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:26+5:302021-01-04T04:09:26+5:30
पुणे : शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत ५ नोव्हेंबर २०२० रोजी परिपत्रक काढले. मात्र त्यात लोकनाट्य तमाशाचा उल्लेख नसल्याने ...
पुणे : शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत ५ नोव्हेंबर २०२० रोजी परिपत्रक काढले. मात्र त्यात लोकनाट्य तमाशाचा उल्लेख नसल्याने पोलीस प्रशासनाकडून कार्यक्रम करण्यास परवानगी मिळत नाही. गेल्या दहा महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने ‘लोकनाट्य तमाशा मंडळ’ असा उल्लेख करून सुधारित परिपत्रक काढावे तसेच लोकनाट्य तमाशा मंडळास कायमस्वरूपी अनुदान पॅकेज मिळावे, राज्यातील लोककलावंतांसाठी त्यांच्या उन्नतीसाठी, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक महामंडळ स्थापन करावे, अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेतर्फे उद्यापासून (दि. ४) बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोविडच्या काळात राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना मागण्यांबाबत निवेदन दिले. मात्र त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत तमाशा कलावंतांना न्याय मिळत नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष आविष्कार मुळे आणि कार्याध्यक्ष संभाजीराव जाधव यांनी सांगितले.