वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांचा स्वातंत्र्यदिनी जलसमाधीचा इशारा; ६० वर्षांनंतरही त्यांच्या नावावर नाहीत सातबारे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 06:59 PM2021-07-12T18:59:09+5:302021-07-12T18:59:19+5:30
पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील 36 शेतकऱ्यांची 292 एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे
मार्गासनी: साठ वर्षानंतर देखील सातबारे नावावर न झाल्याने वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना दिले आहे.
धरणग्रस्तांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील ३६ शेतकऱ्यांची २९२ एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे. येथील ३६ धरणग्रस्तांसाठी हवेली तालुक्यातील नांदोशी येथे सहा एकर जागेमध्ये गावठाण वसलेले आहे. याठिकाणी धरणग्रस्त अनेक वर्षापासून राहत आहे. परंतु या जागेच्या सातबारा उताऱ्यावर अद्याप मूळ मालकांच्या नोंदी आहेत ही जमीन धरणग्रस्तांच्या किंवा शासनाच्या नावावर अद्याप झालेली नाही.
मूळ मालकांच्या नावावर ती या जमिनी आहेत. या जमिनी वर धरणग्रस्तांची नोंद होऊन सातबारे धरणग्रस्तांच्या नावावर झाले पाहिजेत ही मुख्य मागणी धरणग्रस्तांची आहे. यासाठी १२ जुलै पानशेत प्रलय दिनाच्या दिवशी जलसमाधी आंदोलनाचा इशारा धरणग्रस्त कडून देण्यात आला होता.
परंतु जिल्हाधिकारी व धरणग्रस्त यांच्या मध्ये झालेल्या चर्चेमुळे आणि कोरोना महामारीच्या अनुषंगाने सामाजिक भान ठेवत धरणग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन रद्द केले. १२ ऑगस्ट पूर्वी जर धरणग्रस्तांच्या नावे सातबारे झाले नाहीत तर स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला पुन्हा एकदा धरणग्रस्त जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.