स्वतंत्र संकुलास विद्यापीठ प्रशासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:30+5:302021-01-04T04:10:30+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभागाचे स्वतंत्र संकुल उभे राहावे, याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक आहे. तसेच विद्यापीठाच्या ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभागाचे स्वतंत्र संकुल उभे राहावे, याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक आहे. तसेच विद्यापीठाच्या मराठी विभागाने या संदर्भात सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विद्यापीठातील विविध विभागांचे रूपांतर संकुलामध्ये केले आहे. त्यानुसार ‘स्कूल ऑफ इंडियन लँग्वेज’मध्ये मराठी विभागाचा समावेश केला आहे. मात्र, मराठी भाषा संस्कृतीच्या विकासासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे विद्यापीठात मराठी विभागाचे स्वतंत्र संकुल व्हावी, अशी मोहीम लोकमतने हाती घेतली. विविध विद्यार्थी संघटना, मराठी अभ्यास मंडळ सदस्य, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, माजी संमेलनाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, संशोधक विद्यार्थी यांनीसुद्धा ही मागणी उचलून धरली. लोकमतच्या मोहिमेला यश आले असून विद्यापीठाने याबाबत समिती स्थापन केली आहे.
विद्यापीठातर्फे स्थापन केलेल्या समितीमध्ये डी. जी. कान्हेरे, सतीश आळेकर, डॉ. मनोहर जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे ही समिती मराठी विभागाने विद्यापीठाला सादर केलेल्या प्रस्तावावर काय निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
--
उपक्रम राबवणे शक्य : मोहिमेला आले यश
विद्यापीठात मराठी भाषा संकुल व्हावे, यासाठी दोन स्वतंत्र प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात मराठी विभागासह संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम अध्यासनांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे मराठी भाषा व संस्कृतीचा अभ्यास आणि व्यावसायिक मराठी भाषाव्यवहार ह्या राष्ट्रीय केंद्राची निर्मिती करावी. त्यामुळे शैैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणे शक्य होईल, असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.
(मालिका समाप्त)