पुरंदरच्या शेतकऱ्यांचा स्वतंत्र ठसा
By admin | Published: January 31, 2015 10:55 PM2015-01-31T22:55:52+5:302015-01-31T22:55:52+5:30
कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़
खळद : कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़ नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आपला स्वतंत्र ठसा उमटविला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले़
सासवड येथे पालखी मैदानावर होणाऱ्या तीन दिवसाच्या जयमल्हार कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या झाले़ या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामथे, अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, वैशाली नागवडे, माणिकराव झेंडे, दिलीप यादव, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी जगताप, सभापती गौरी कुंजीर, शिवाजी पोमण, बाळासाहेब कामथे, मनिषा काकडे, गंगाराम जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, पुरंदरचा वाटाणा देशात प्रसिध्द् आहे़ येथील भाजीपाला संपूर्ण जगात जातो़ दुग्ध व्यवसाय वाढ झाली, युवकांनी शेतीत हरितगृहचा स्विकार करीत दर्जेदार उत्पन्न वाढविले़ तसेच अंजिर,डाळींब, सिताफळ यांचे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन शेती क्षेत्रात मोठा बदल घडविला आहे.
प्रदीप कंद म्हणाले, दर्जेदार शेतीचा प्रयत्न व्हावा, कमी पाण्याचा वापर करीत आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे,यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्याच्या वापराचे ज्ञान मिळावे यासाठी अशा कुषी प्रदर्शनांचे आयोजन जिल्हा परीषदेकडून होत आहे़
तालुक्यात प्रथमच एवढे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करता आल्याचे समाधान वाटत असल्याचे निमंत्रक जि. प. च्या कृषी व पशुसवर्धन सभापती सारीका इंगळे यांनी सांगितले़
या वेळी दादा जाधवराव, आनंदी जगताप,गौरी कुंजीर यांचीही भाषणे झाली़ प्रास्ताविक अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, सुत्रसंचालन पी.एस.मेमाणे यांनी केले तर आभार सुदामराव इंगळे यांनी मानले. (वार्ताहर)