पुण्यात उभे राहणार स्वतंत्र भव्य " मुद्रांक भवन "
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:57+5:302021-02-10T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणा-या विभागापैकी एक असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणा-या विभागापैकी एक असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासाठी स्वतंत्र ‘मुद्रांक भवन’ उभारण्यासाठी राज्य शासनाने पुण्यातील बंडगार्डन येथील १५ गुंठे जागा मंजूर केली आहे. आता पुण्यात लवकरच स्वतंत्र ‘मुद्रांक भवन’ उभे राहणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सहनोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागानंतर शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणजे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग होय. परंतु या विभागाचे राज्याचे कार्यालय सध्या पुण्यातील शासनाच्या अन्य विभागाच्या एका भाड्याच्या जागेत सुरू आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला स्वत:चे स्वतंत्र कार्यालय असावे, यासाठी जागेचा शोध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. यात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खिलारी यांनी महसूल विभागाकडे प्रचंड पाठपुरावा केला. अखेर शासनाने मुद्रांक भवनसाठी बंडगार्डन येथील 15 गुंठे जागा मजुर केली आहे.
राज्य शासनाने बंडगार्डन येथील भूमापन क्र.१० अ. सरे नं.मुंजेरी ३८, ता. पुणे शहर येथील एकूण १४२१.४ चौ. मी.(१५ गुंठे) इतकी जागा नोंदणी व मुद्रांक विभागासाठी‘नोंदणी भवन’ या नावाने स्वतंत्र नवीन इमारत बांधणे या प्रयोजनासाठी मिळणेबाबत विनंती केली होती. या मागणी नुसार सध्या कार्यालये असलेल्या नवीन प्रशासकीय इमारती लगत असलेल्या एका जुन्या सरकारी बंगल्याची ही जागा असल्याचे खिलारी यांनी सांगितले.