स्वतंत्र कार्यालयाची गरज

By admin | Published: June 10, 2015 05:03 AM2015-06-10T05:03:21+5:302015-06-10T05:03:21+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेली सर्वच गावे अजूनही पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाशी जोडली गेली आहेत.

Independent office requirement | स्वतंत्र कार्यालयाची गरज

स्वतंत्र कार्यालयाची गरज

Next

भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेली सर्वच गावे अजूनही पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाशी जोडली गेली आहेत. या कार्यालयाशी सबंधित असणाऱ्या सर्व कामासाठी येथील नागरिकांना व रेशन दुकानदारांना पुण्यातील कार्यालयातच ये-जा करावी लागत आहे. तेथील वितरणप्रणाली व शासकीय कामात होत असलेली दिरंगाई यामुळे शहरवासीयांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्येचा विचार करता स्वतंत्र अन्नधान्य पुरवठा कार्यालय होणे गरजेचे आहे. मात्र अनेक वेळा मागणी होऊनही स्वतंत्र कार्यालयाबाबत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अन्न-धान्यपुरवठा कार्यालयाच्या ‘अ’ व ‘फ’ परिमंडल व या भागाचा समावेश होत असून, नागरिकांचा सतत या कार्यालयाशी संबंध येतो. परिमंडल विभागाची प्रशासकीय यंत्रणेच्या सोईनुसार रचना केली आहे. त्यातील ‘अ’ परिमंडल कार्यालय निगडी येथे आहे, तर ‘फ’ कार्यालय पुणे शहर क्षेत्रामध्ये आहे. नागरिकांची गरज व सोईनुसार अन्नधान्य पुरवठा कार्यालयाची एकूण आठ शिवाजीनगर येथे कार्यरत आहे. सुरुवातीला खडकी येथील रेंजहिल्समध्ये असलेले ‘फ’ हे कार्यालय काही कारणास्तव शिवाजीनगर येथील तटपुंज्या गोदामामध्ये काही वर्षांपूर्वी स्थलांतरित झाले. त्यामुळे शहरातील शिधा धारकांच्या अनेक अडचणी वाढल्या. त्या आजतागायत सुरूच आहेत. यामध्ये सर्वात जास्त अडचणी भोसरी विधानसभा मतदारसंघातील व महापालिकेत समाविष्ट झालेल्या तळवडे, चिखली, डुडुळगाव, मोशी, चऱ्होली, दिघी, तसेच भोसरीगाव व जवळ असणाऱ्या इंद्रायणीनगर, संतनगर, स्पाइन रोड परिसर या भागाचा संबंध ‘फ’ कार्यालयाशी येतो. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता व ‘फ’ कार्यालयाचा कामाचा व्याप पाहता पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र अन्न धान्यपुरवठा कार्यालय निर्माण होणे नागरिकांची महत्त्वाची गरज आहे.
सुरुवातीच्या काळात लोकसंख्येचा विचार करूनच शासनाने सर्व प्रशासकीय कार्यालये स्थापन केली होती व करीतही असते. पण सध्याच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय कामकाजाच्या पातळीवर नागरिकांबरोबरच शासनालासुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही बाब शासन दरबारी निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्यामुळे हवेली तालुक्याच्या विभागणीबरोबरच अन्नधान्य पुरवठा विभागाचे विभाजनही शहरासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सद्य:स्थितीत शिधापत्रिका धारकांना अन्न-धान्यासाठी आणि रॉकेलसाठी महिनोन् महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे अतिशय हाल व उपासमार होत आहे.महापालिका क्षेत्रासाठी नवीन स्वतंत्र कार्यालयासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरु करणे गरजेचे आहे. राज्यात सर्वात मोठे हवेली तालुक्याचे कार्यक्षेत्र असल्यामुळे अनेक कार्यालये जशी स्वतंत्र केली जात आहेत. त्याच प्रकारे पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रासाठी अन्नधान्य कार्यालये का स्वतंत्र केली जात नाहीत असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)

अनेक शिधापत्रिका बनावट
शहरात अनेक शिधापत्रिका बनावट असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. त्यासाठी विभागाने शोधमोहीमही राबविली होती. पण त्या मोहिमेला अधिक यश आले नाही. जवळच कार्यालय झाले, तर शहरातील नागरिकांना सहज शिधापत्रिका व इतर कामे करता येतील, नागरिकांचा थेट संवाद वाढेल. शिधापत्रिका काढण्यासाठी लागणारा वेळ, होणारी परवड टाळण्यासाठी नागरिक दलालाच्या फसवणुकीला बळी पडून आर्थिक नुकसान करून घेत आहेत. शहरात स्वतंत्र अन्नपुरवठा विभाग सुरूझाल्यास अनेक समस्या सुटण्यास मदत होणार असून, दलालांचा सुळसुळाटही बंद होण्यास मदत होईल.

Web Title: Independent office requirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.