पेड न्यूज ,आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडियावरील पोस्टबाजी यांवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा : नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 12:37 PM2019-03-01T12:37:43+5:302019-03-01T12:48:23+5:30
जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज..
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून निवडणूक काळात होणाऱ्या पेड न्यूज ,आर्थिक व्यवहारांवर आणि सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. तसेच मोबाईल नेटवर्क पोहचत नाही, अशा ६९ ठिकाणांशी सुसंवाद ठेवण्यासाठी सॅटेलाईट फोन खरेदी केले जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरूवारी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नवल किशोर राम बोलत होते.त्यांनी पुणे,मावळ,बारामती व मुळशी लोकसभा मतदार संघाची सविस्तर माहिती दिली.यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह ,जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी होते.
राम म्हणाले,निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे सप्टेबर २०१८ पासून जानेवारी २०१९ पर्यंत अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेतली. अजूनही मतदारांची नोंदणी करण्याचे काम सुरू असून निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतरही मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना कोणत्या सुविधा हव्या आहेत,याबाबतची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाला मोबाईल अँपद्वारे कळवता येणार आहे.त्यानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
जुन्नर, आंबेगाव,खेड,मुळशी आदी तालुक्यात काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क किवा वायरलेस यंत्रणा काम करत नाही. जिल्ह्यात अशी ६९ ठिकाणे आहेत. निवडणूक काळात या ठिकाणांशी संपर्क ठेवता यावा, या उद्देशाने सॅटेलाईट फोन खरेदी केले जात आहेत.त्यासाठीचा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून घेण्यात आला आहे. तसेच मागील निवडणूकांचा अनुभव विचारात घेवून जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर योग्य पोलीस बंदोबस्त व इतर यंत्रणा उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे १ कोटी ४ लाख असू शकते. या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्यात सध्या ७३ लाख ६३ हजार ८१२ मतदारांची नोंदणी झालेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदारांची संख्या ६३ लाख ४८ हजार ७०४ एवढी होती. यंदा १८ ते १९ वर्षे वय असलेल्या मतदारांची संख्या ५४ हजार ११५ आहे. निवडणूक प्रक्रियेत काम करणा-या कर्मचा-यांना मतदान करता यावे,यासाठी सुमारे ५५ हजार कर्मचा-यांची पोस्टल पध्दतीने मतदान करून घेतले जाणार आहे. पुरूष मतदारांच्या गुणोत्तर प्रमाणात महिला मतदारांच्या संख्या वाढली आहे,असेही राम यांनी सांगितले.
...............
लोकसभा निवडणूकी विषयी महत्त्वाची आकडेवारी
एकूण मतदार ७३,६३,८१२ (२०१९) , ६३,४८,७०४ (२०१४)
पुरूष मतदार ३८,५१,४४५ (२०१९), ३३,५३,६८८ (२०१४)
महिला मतदार ३५,१२,२२८ (२०१९), २९, ९५, ००४ (२०१४)
ट्रान्सजेंडर -१३९ (२०१९), १ (२०१४)
नवमतदार- ५४,११५ (२०१९),६९,२६१ (२०१४)
दिव्यांग मतदार- १३,७४९
यादीतून वगळलेले मतदार -५९,९२२