पालिकेचा स्वतंत्र टीबी कक्ष अडकला चर्चेच्या गुऱ्हाळात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 01:07 PM2019-07-13T13:07:07+5:302019-07-13T13:08:08+5:30
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व अंमलबजावणीकरिता स्वतंत्र कक्ष व पूर्ण वेळ अधिकाऱ्याची आवश्यकता आहे.
पुणे : शहराची लोकसंख्या आणि क्षयरोग (टीबी) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिके च्या आरोग्य विभागामध्ये स्वतंत्र टीबी कक्ष असावा आणि त्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा अनुभव असलेल्या पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला असून हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांना सादर करण्यात आला होता. अतिरीक्त आयुक्तांनी या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करावी असा शेरा मारला. परंतू, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना अद्याप या विषयावर चर्चा करायला वेळच न मिळाल्याने हा कक्ष चर्चेच्या गुऱ्हाळात अडकल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रामध्ये १९९८-९९ पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहेत. त्यासाठी राज्य क्षयरोग नियंत्रण सोसायटी व जिल्हा/शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटीची स्थापना करण्यात आलेली आहे. शासनाने २०१५ अखेर देश क्षयमुक्त करणे आणि जागतिक आरोग्य संघटनेने २०३५ पर्यंत जगामधून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे ठरविले आहे. अपेक्षित एकूण क्षयरुग्णांपैकी किमान ९० टक्के रुग्ण शोधणे, रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांवर यशस्वी औषधोपचार पूर्ण करणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.
संबंधित रुग्णाच्या घरी भेट देणे, औषधोपचार सुरु करणे, रुग्ण व कुटुंबियांचे समुपदेशन करणे, पत्ता व अन्य कागदपत्रे बँक खात्याची माहिती भरुन घेणे आदी कामे पालिकेच्या डॉक्टर आणि कर्मचाºयांना करावी लागतात. परंतू टीबी युनिटच्या कार्यक्षेत्राचे वाटप योग्यरितीने झालेले नसल्याने घराजवळ औषधोपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. यासोबतच नव्याने समाविष्ठ झालेल्या ११ गावांच्या कार्यक्षेत्राचा टीबी युनिटीनिहाय नव्याने सूक्ष्म कृती आराखडा तयार करुन कामकाजाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले होते.
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांच्याकडून सर्वेक्षण करुन घेणे गरजेचे आहे. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व अंमलबजावणीकरिता पूर्ण वेळ अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. पालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोग केंद्र आहे. शासन निदेर्शांकानुसार २०१८ मध्ये ३४ लाख ३ हजार तर २०१९ मध्ये ३४लाख ४४ हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. सध्या पालिकेकडे अडीच लाख लोकसंख्येमागे एक टीबी युनिट असून ३४ लाख ४४ हजार लोकसंख्येसाठी ११ टीबी युनिट कार्यरत आहेत. एक लाख लोकसंख्येमागे एक थुंकी तपासणी केंद्र असणे आवश्यक आहे. सध्या असे २९ थुंकी तपासणी केंद्र कार्यरत आहेत.
=====
पालिकेच्या आरोग्य विभागाने टीबीसाठी स्वतंत्र कक्ष असावा असा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर अतिरीक्त आयुक्तांनी चर्चा असा शेरा मारला आहे. याविषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. परंतू लवकरच चर्चा करुन आयुक्तांना प्रस्ताव सादर केला जाईल. आरोग्य विभागाकडे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मनुष्यबळाचा अभाव ही मोठी समस्या आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य अधिकारी