तृतीयपंथींच्या स्वतंत्र वॉर्डला ससूनकडून मिळेना आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:24 AM2022-10-31T10:24:37+5:302022-10-31T10:28:04+5:30

ससून रुग्णालयाने याविषयी विचार करून असा वॉर्ड सुरू करावा, अशी मागणी तृतीयपंथींकडून केली जात आहे...

Independent wards of third parties do not get support from Sassoon | तृतीयपंथींच्या स्वतंत्र वॉर्डला ससूनकडून मिळेना आधार

तृतीयपंथींच्या स्वतंत्र वॉर्डला ससूनकडून मिळेना आधार

Next

पुणे : तृतीयपंथींच्या उपचारासाठी मुंबईतील जी. टी. रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड केला जाणार आहे. परंतु, अशी मागणी पुण्यातून सर्वप्रथम ससून रुग्णालयातील अधिष्ठाता यांना करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुणे शहरात तृतीयपंथींची मोठी संख्या आहे. त्यांना उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे. म्हणून आता तरी ससून रुग्णालयाने याविषयी विचार करून असा वॉर्ड सुरू करावा, अशी मागणी तृतीयपंथींकडून केली जात आहे.

सर जे. जे. रुग्णालय समूहाच्या अखात्यारित जी. टी. रुग्णालय येते. त्या ठिकाणी वॉर्ड क्रमांक १३ मध्ये तृतीयपंथींना विशेष उपचार मिळणार आहेत. नवीन वर्षात ही सोय केली जाणार असून, त्यासाठी मार्गदर्शन तत्त्वेही तयार केली आहेत. पण या विषयाची पहिली मागणी ससून रुग्णालयात १५ जानेवारी २०२१ रोजी तत्कालीन अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांच्याकडे केली होती. तेव्हा तृतीयपंथींच्या शिष्टमंडळाने तांबे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले होते. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी, प्रेरणा वाघेला, कादंबरी (मयुरी) या उपस्थित होत्या.

शहरातील तृतीयपंथींची वैद्यकीय तपासणी, चाचणी तसेच एक राखीव वॉर्ड आणि खिडकी योजना असायला हवी, या मागण्या निवेदनात होत्या. त्यावेळी तांबे यांनीदेखील लवकरच असा स्वतंत्र वॉर्ड सुरू करू, असेही आश्वासन व लेखी हमीपत्र दिले होते. परंतु, त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही. आता मुंबईत अशी सुविधा उपलब्ध होत असल्याने किमान आता तरी ससून रुग्णालयाने याविषयी विचार करून त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी यांनी केली आहे.

आज सरकारी रुग्णालयात तृतीयपंथी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इतर राज्यात सरकारी रुग्णालयात तृतीयपंथी वॉर्ड तयार झाला असून, पुण्यात कधी होणार हा प्रश्न पडला आहे? पुण्यात चांगल्या गोष्टींची सुरुवात होत असते. परंतु, तृतीयपंथींसाठी स्वतंत्र वॉर्ड अद्याप का करण्यात आलेला नाही. आम्हालादेखील चांगला उपचार हवा आहे. ससूनमध्ये वॉर्ड सुरू करून आम्हाला न्याय द्यावा.

- कादंबरी, तृतीयपंथी महिला, सामाजिक कार्यकर्ती

Web Title: Independent wards of third parties do not get support from Sassoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.