Supriya Sule: इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
By अजित घस्ते | Published: June 6, 2024 06:43 PM2024-06-06T18:43:17+5:302024-06-06T18:43:46+5:30
सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडे नसली तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा आहे
पुणे: सत्ता स्थापनेसाठी भाजपची संपूर्ण तयारी झाली आहे. नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधानपदाची शपथही घेणार आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. इंडिया आघाडीकडून घटक पक्षांना सामील करून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. यावरून इंडिया आघाडी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसू लागले आहे. या घडामोडींबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीये. सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडे मॅजिक फिगर नाही. परंतु इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा आहे असे यावेळी म्हणाल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर पुण्यात प्रथमच मार्केटयार्डात येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यभिषेक दिन निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथम मार्केटयार्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या उत्साहात फुले आणि गुलालाची उधळण करून पारंपरिक वाद्य वाजवत जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीचे सर्वेशेवा शरद पवार यांची प्रतिमा हातात घेऊन पवार साहेबांच्या विजयाचा जयघोष करण्यात आला.
सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने राज्याच्या समोर होती. सर्वत्र राज्यभर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी छावण्याची मागणी असून ती मान्य होत नाही. चारा डेपो नसून पाण्याचे टँकर देखील वेळेवर पोहोचत नाहीत. या सर्व प्रकाराला राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. जनतेने महाविकास आघाडीला दिलेली साथ यामुळे कामाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. म्हणून यापुढे आणखीन जबाबदारी वाढलीये. काम करीत राहणे आणि विकास करणे हेच खरे कार्य आहे.
दुष्काळासाठी मदत करा
राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण असून, शेतीला पाणी नाही. यामुळे रोहित पवार आणि मी उद्या पासून महाराष्ट्र दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी जेसिबी, क्रेनच्या साहाय्याने स्वागत करू नका त्यापेक्षा चारा छावणी, पाणी आणि दुष्काळासाठी मदत करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.