Pune: इंडिया फ्रंट दाखवणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 07:05 PM2023-07-29T19:05:12+5:302023-07-29T19:10:32+5:30
लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवारी (दि. १) रोजी मोदी पुण्यात येणार आहेत...
पुणे : जळते मणिपूर वाऱ्यावर सोडून देश-परदेशात दौरे करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही. त्यासंबंधी त्यांनी साधे निवेदनही प्रसिद्ध केलेले नाही. या निषेधार्थ पुणे दौऱ्यात मोदींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचे ‘इंडिया फ्रंट’ या विरोधी पक्षाच्या राजकीय आघाडीच्या पुणे शाखेच्या वतीने शनिवारी जाहीर केले.
लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवारी (दि. १) रोजी मोदी पुण्यात येणार आहेत. त्यावेळी काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर तसेच नितीन पवार, लता भिसे, मेधा थत्ते, दत्ता पाकिरे, अनिस अहमद, संदीप बर्वे, इब्राहिम खान, दीपक पाटील, सुरेखा गाडे व अन्य सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
देशातील एक महत्त्वाचे राज्य मागील ३ महिने हिंसाचाराच्या आगीत जळत आहे व तुम्ही देशात, परदेशात दौैरे कसे करू शकता? असा प्रश्न पंतप्रधानांना आम्ही पुणेकरांच्या वतीने विचारणार आहोत? असे जगताप, मोरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.