जगात सर्पदंशाचे सर्वाधिक रुग्ण भारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:53+5:302021-08-13T04:13:53+5:30
-- नागपंचमी विशेष अशोक खरात : खोडद जगात सर्वाधिक सर्पदंश भारतात होत असून सर्पदंशामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी ...
--
नागपंचमी विशेष
अशोक खरात : खोडद
जगात सर्वाधिक सर्पदंश भारतात होत असून सर्पदंशामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी जगभरात ५० ते ६० लाख लोकांना सर्पदंश होतो, तर त्यापैकी २७ ते ३० लाख लोकांना विषबाधा होते ८० हजार ते १ लाख ३८ हजार लोकांनाच सर्पदंशामुळे मृत्यू होतो. सर्पदंशामुळे ४ लाखांपेक्षा अधिक लोकांना कायमचे अपंगत्व येते. अनेक रुग्णांमचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात तर काहींमध्ये मध्ये दृष्टी दोष निर्माण होतात किंवा दोन्ही किडन्या कायमस्वरूपी निकाम्या होतात. काही रुग्णांना सतत मानसिक त्रास होतो आणि याचे दुष्परिणाम अनेक वर्षांपर्यंत राहतात. जगात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूपैकी जवळपास ५० टक्के मृत्यू भारतात होतात. भारतात दरवर्षी सरासरी ५८ हजार रुग्णांचा सर्पदंशाने मृत्यू होतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य व सर्पदंश तज्ज्ञ सदानंद राऊत यांनी सांगितले.
नागपंचमी सणानिमित्त भारतातील सर्पदंशाबद्दल त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळी ते बोलत होते. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात २००५ पासून डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी ''शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प'' सुरू केला आहे. त्याअंतर्गत आदिवासी वाडी, वस्ती, शाळा, महाविद्यालये, आशा वर्कर, वनकर्मचारी यांना विषारी व बिनविषारी सर्प ओळखणे, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार या विषयी व्याख्याने व माहितीपटांच्या द्वारे माहिती देऊन त्यांच्यात प्रबोधन केले जाते.
डॉ. राऊत म्हणाले की, शिक्षणाचा अभाव ,सर्पदंशाविषयी गैरसमज, जनजागृतीचा अभाव, अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्पदंश हा आजार अतिदुर्लक्षित आजार आहे. सर्पदंश साधारणपणे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, सर्पमित्र, शिकारी, आदिवासी, मच्छिमार यांना होतो. बहुतांश रुग्ण हे कुटुंबातील कर्ते तरुण , महिला व मुले असतात. जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ मध्ये जिनिव्हा येथील परिषदेत सर्पदंशाची अतिदुर्लक्षित आजारांमध्ये गणना केली आहे.
--
कोट
सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचाराविषयी अज्ञान व अपुरे ज्ञान, सर्पदंश झाल्यानंतर तातडीने आणि योग्य ते उपचार उपलब्ध न होणे, प्रशिक्षित वैद्यकीय व खासगी डॉक्टरांची अनुउपलब्धतता याच्यामुळे भारतात सर्पदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०३० पर्यंत ५० टक्क्यांवर आणण्याचे ठरवले आहे.
डॉ. सदानंद राऊत, नारायणगाव
तज्ज्ञ सर्पदंशसमिती, जागतिक आरोग्य संघटना