धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू : डॉ गणेश देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:27+5:302021-09-26T04:13:27+5:30
पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू ...
पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू शकतो हे स्वीकारणारी ती सहिष्णू संस्कृती होती. भारताकडे केवळ भाषेच्या नजरेतून पाहणे सार्थ ठरेल. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू आहे, असे परखड मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी केले.
ग्रंथाली, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग व साधू कुटुंबीय यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू स्मृतिव्याख्यानामध्ये ‘भाषांच्या नजरेतून भारत’ या विषयावर ते बोलत होते. अविनाश पोईनकर, नीलेश बुधावले आणि शर्मिष्ठा भोसले यांना अरुण साधू पाठ्यवृत्ती जाहीर करण्यात आली. पाठ्यवृत्तीप्राप्त मेघना ढोके, मुक्ता चैतन्य आणि दत्ता जाधव यांनी अभ्यासलेल्या विषयांच्या पुस्तकांचे तसेच अरुण साधू लिखित ‘माझ्या मराठीचा बोल’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, कन्या सुवर्णा साधू, शेफाली साधू, ग्रंथालीचे धनंजय गांगल, सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते. ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर, वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि पत्रकार पराग करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
हडप्पा संस्कृतीनंतर पाचशे वर्षांनी इ. स. पूर्व १५०० मध्ये वैदिक संस्कृती सुरू झाली. त्याआधी द्राविडी, प्राकृत, पाली या भाषा होत्या. भाषा एकत्र येणे आणि एकमेकांची अक्षरे स्वीकारणे, यातून भारतीयांनी संबंध टिकवून ठेवले. भारतीय संस्कृती बहुभाषिक राहिली. संस्कृतमधील अनेक तज्ज्ञ अन्य भाषा जाणत असल्याची नोंद आहे. कालिदासाच्या नाटकातील पात्र चार-पाच भाषा बोलायची. या समाजावर सनातनी धर्म लादला गेला. बहुभाषिक समाजाला छळले गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
------