हवामान बदलासाठी भारत जबाबदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:52+5:302021-06-06T04:08:52+5:30

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश ...

India is not responsible for climate change | हवामान बदलासाठी भारत जबाबदार नाही

हवामान बदलासाठी भारत जबाबदार नाही

Next

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश जबाबदार नाही. मात्र, पर्यावरण संवर्धनात भारताचा सहभाग गरजेचा आहे, असे मत केंद्रीय वन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पर्यावरण ‘ई-शिक्षण केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य केले. यावेळी डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, डॉ. प्रफुल्ल पवार, वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, पर्यावरण शिक्षण केंद्राचे प्रमुख विवेक नाबर, डॉ. बाळकृष्ण दामले, माजी नगरसेवक विकास दांगट, भवताल मासिकाचे संपादक अभिजित घोरपडे उपस्थित होते. यावेळी ‘तळजाई - ग्रीन हार्ट ऑफ द सिटी’ हा माहितीपटही दाखवण्यात आला.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांच्या सद्य:स्थितीचे माहिती संकलन केल्याने यात पुढील काळात काय बदल झाले याचा अभ्यास करण्यासाठी ‘बेसलाईन डेटा’ तयार होईल. अनेक संस्थांच्या मदतीने हे काम विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग करत आहे.

डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, पर्यावरण रक्षण हे शास्त्रीय पद्धतीने केल्यास एक चांगला डेटाबेस पुढच्या पिढीसाठी या ई-साहित्यातून निर्माण होईल. अभिजित घोरपडे म्हणाले, ‘झाडे लावा व प्लास्टिक टाळा’ या पलीकडे जाऊन पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याची सध्या गरज आहे.

----------

पर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नसून ‘नैसर्गिक अधिवास’ ही संकल्पना जाणून घेऊन अभ्यासपूर्ण संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे. या ई-साहित्याच्या माध्यमातून दर्जेदार पर्यावरण साहित्य व उपयुक्त डेटाबेस निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

------

Web Title: India is not responsible for climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.