भारतात लोकशाही आहे, तर सत्य काहून बोलू नये..?, सरकारी यंत्रणेवर परखड टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:47 AM2017-10-24T01:47:34+5:302017-10-24T01:47:40+5:30
पुणे : महात्मा जोतिबा फुल्यांनी ‘सत्य सर्वांचे आदी घर...’ असे सांगून सत्याचा आग्रह धरला. इतकंच काय महात्मा गांधींजींनी देखील सत्याचे प्रयोग केले आणि सत्य हेच अंतिम असते, असे सांगितले.
धनाजी कांबळे
पुणे : महात्मा जोतिबा फुल्यांनी ‘सत्य सर्वांचे आदी घर...’ असे सांगून सत्याचा आग्रह धरला. इतकंच काय महात्मा गांधींजींनी देखील सत्याचे प्रयोग केले आणि सत्य हेच अंतिम असते, असे सांगितले. मात्र, आज देशात, राज्यात परिस्थिती याच्या बरोबर विरोधातली आहे. कुणी काय बोलले, की लगेच त्याला नियंत्रित करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज होते. परंतु, स्वतंत्र भारतात जिथे लोकशाहीने कारभार चालतो. तिथे सत्य काहून बोलू नये, असा रोखठोक सवाल अकोला जिल्ह्यातील अकोट येथील राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी केला. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता ‘लोकमत’ला त्यांनी विशेष मुलाखत दिली.
सत्यपाल महाराज म्हणाले, ‘समाजातला सगळ््यात तळातल्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे. तरच देशाचा विकास होऊ शकतो. केवळ धनदांडग्यांचं हित बघून देश आगे नही बढेगा. संत गाडगेबाबा केवळ धोबी समाजाचे म्हणून त्यांचे नाव स्वच्छ भारत अभियानाला मिळू शकले नाही. तेच ते एखाद्या धनदांडग्याचे नाव असते, तर त्यांना डोक्यावर घेऊन सरकारं नाचली असती, एवढी प्रतिभा आणि कर्मयोगी वृत्ती गाडगेबाबांची होती. आज दिसणारं चित्र आणि प्रत्यक्षातलं चित्र यात जमीनआसमानचा फरक दिसतो. कारण लोक हल्ली प्रश्नच विचारत नाही. त्यांना प्रश्नच पडत नाहीत की काय, असं माझ्यासारख्या साध्या माणसाला वाटतं. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, कबीर, तुकोबा यांनी माणसांच्या डोक्यातील घाण बाहेर काढण्याचं काम केलं. माणसांचे मेंदू स्वच्छ करण्याचं काम केलं. आज आपण केवळ बाहेरचा कचरा साफ करीत आहोत. खरं तर माणसांची कलुशीत मनं साफ करावी, अशी आजची परिस्थिती दिसत आहे.’
कुणी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. खरं बोलले. खरं लिहिले, तर त्याच्यावर नियंत्रण करण्याची आणि त्याच्या अभिव्यक्तीलाच मारण्याची एक यंत्रणा प्रभावीपणे काम करताना दिसत आहे. एवढंच नाही, तर काही पत्रकारांनाही नोटिसा दिल्या जात आहेत, हे अतिशय भयानक आहे. हे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतु:सूत्रीच्या आधारे देशाची राज्यघटना लिहिली. त्या संविधानाचाच हा एकप्रकारचा अपमान आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. झुंडशाहीच्या जोरावर लोकांची मनं जिंकता येत नाहीत. लोकशाहीत सामोपचारानेच निर्णय घेतले गेले पाहिजेत, असेही सत्यपाल महाराज म्हणाले.
तुकडोजी बाबा म्हणायचे,
एकतरी अंगी असू दे कला
नाहीतर काय फुका जन्मला...
प्रत्येक माणसाला कायतरी कला अवगत असलीच पाहिजे. कलेमुळे तो विचार करू शकतो. आम्हाला गाण्याची कला असल्यामुळे आम्ही मनोरंजनातून प्रबोधन करतो. आणि जसे बोलतो, तसेच वागतो. साने गुरूजींनी सांगितले आहे, खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...जगाला प्रेम वाटत गेलं पाहिजे. पे्रमानेच माणसांचं मन जिंकता येतं, हे सगळ््यांनी ध्यानात घेतले, तर खून, मारामाºया होणार नाही. किती मोठा विचार साने गुरुजींनी दिला आहे. सगळ््याच महापुरुषांनी हाच विचार सांगितला आहे, पण समाजाची मानसिकता कशी असते, जे वाईट ते आधी स्वीकारायचे आणि चांगले ते नंतर...हे बदलले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कीर्तनातून प्रबोधन !
१४,००० गावांमध्ये कीर्तनं केली. व्यसनमुक्ती, निर्मलग्राम, तंटामुक्ती, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवी नातेसंबंधांबाबत आम्ही कीर्तनातून प्रबोधन करतो. मात्र, सत्य सांगितले की ते अजूनही कडू वाटते, अशी परिस्थिती असते. तरीही सत्याने वर्तावे ज्योती म्हणे...हे आम्हाला उमगले आहे. त्यामुळे जेवढे सत्य लोकांपुढे मांडता येईल, ते त्यांच्याच भाषेत सांगण्याचा प्रयत्न असतो, असे सत्यपाल महाराज म्हणाले.